शिरूर अनंतपाळ : तालुक्यात १३२ के.व्ही.नवीन विद्युत केंद्र उभारणी संदर्भात गुरुवारी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची महावितरण व महापारेषणच्या अधिका-यासोबत मंत्रालयामध्ये महत्वपुर्ण बैठक झाली असून यात सकारात्मक निर्णय झाल्याने अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असून तालुक्यात शासकीय जागी नवीन १३२ के व्ही केंद्र स्थापन होऊन लवकरच विजेच्या बाबतीत तालुका स्वयंपुर्ण होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिली आहे.
उच्च दाबाने विजपुरवठा होत नसल्याने तालुक्यात विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी तालुक्यात १३२ के.व्ही.केंद्राची उभारणी व्हावी, अशी मागणी तालुक्यातील जनतेतून केली जात होती.अखेर याला यश आले या संदर्भात मंत्रालयात महावितरण,महापारेषणचे संचालक,मुख्य अभियंता,अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व इतर संबंधित अधिका-यांंच्या उपस्थितीत बैठक घेतल्याने १३२ के.व्ही.नवीन केंद्र उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान शिरूर अनंतपाळ तालुका निर्मितीला दोन दशक झाल्यानंतरही विकास कामापासून वंचित आहे. यात वीज पुरवठा उच्च दाबाने होत नसल्याने लघु उद्योजक, व्यापारी, शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे तालुक्यात १३२ के.व्ही. विद्युत केंद्र उभारून वीजेच्या बाबतीत होणारी सर्वांची हेळसांड टाळावी, या करिता तालुका निर्मितीपासून नागरिकांतून मागणी करण्यात येत होती. अखेर पाठपुराव्याने यश आले आहे. राजमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जागा पाहणीसह पुढील कार्यवाही सुचना केल्या असून १३२ केव्ही विद्युतकेंद्र उभारणीमुळे विजेची अडचण कायम दुर होणार आहे.