लातूर : एजाज शेख
कोरोना महामारीस प्रतिबंध घालण्यात लातूर जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण व आरोग्य यंत्रणेने मोठ्या प्रमाणात कार्यरत होऊन शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत गेल्या १ जानेवारी ते २७ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार २५१ लोकांची कोरोना टेस्ट केली. त्यात १०५५३३ आरटीपीसीआर टेस्टचा तर ६६६९८ रॅपिड अॅटीजेन टेस्टचा समावेश आहे. या चाचण्यांमध्ये १४७०२ जणांचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. १४६६५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून गेल्या वर्षभरात ३७ जणांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
संपूर्ण देशभरात कोरोना महामारीचा कहर सुरु होता. लातूर जिल्हा मात्र कोरोनापासून मुक्त होता. मात्र जिल्ह्यात एप्रिलमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर ही संख्या सातत्याने वाढत गेली. प्रारंभीच्या पाच महिन्यांत म्हणजेच जुलैपर्यंत कोरोना बाधितांची संख्या जेमतेम होती. परंतु, जुनमध्ये लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथीलता मिळाली. परिणामी मुंबई, पुणे, हैदराबाद आदी शहरांतील नागरिकांनी आपले गाव गाठले आणि कोरोना रुग्ण संख्येत पाहता पाहता वाढ झाली. आगस्ट महिन्यांत रुग्णसंख्या सहा हजाराच्या घरात गेली. त्यानंतर सप्टेंंबर महिन्यांत कहरच झाला. या एका महिन्यात १ हजार १८८ इतकी रुग्णसंख्या झाली.
ऑक्टोबर महिना जिल्ह्यासाठी दिलासा देणार ठरला. या महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या कमी होत गेली. डिसेंबर महिन्यांत १ हजार १५० करोना रुग्णांची भर पडली तर नव्या वर्षातील जानेवारी महिन्यात आतापर्यंत ८२३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. इतर रुग्णांनी मात्र कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.