लातूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांत कोविड-१९ रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे, ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी. पी. यांनी दि. २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी फेसबुक लाईव्हमध्ये लातूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच खाजगी कोचिंग क्लासेस संचालकांनी पाच दिवसांत क्लासमधील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करुन घेण्याचे आदेश दिले होते. मात्र ९० कोचिंग क्लासेसमधील सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांपैकी फक्त ४४८ विद्यार्थ्यांचीच कोरोना चाचणी करुन घेतल्याने क्लासेसच संचालकांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला हरताळ फासरल्याचे सदर आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. शासनाच्या सूचनेनूसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष पृथ्वीराज बी. पी. यांनी विविध स्वरुपाचे आदेश जारी केले आहेत. दि. २५ २४ फेब्रुवारीपासून पाच दिवसांत जिल्ह्यातील सर्वच खाजगी कोचिंग क्लासेस संचालकांनी त्यांच्या क्लासमधील सर्व विद्यार्थ्याची कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आदेश दिले होते. इतकेच नव्हे तर जिल्ह्यातील खाजगी क्लासेसमध्ये जितके विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करुन घेण्याची जबाबदारी त्या त्या क्लासेसच्या संचालकांची आहे. त्यासाठी आवश्यक आरोग्य विभागाचे चाचणी पथक उपलब्ध करुन दिले जाईल, असे नमुद केले होते. त्यानूसार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक पाच दिवस उद्योग भवन परिसरात होते. कोरोना चाचणी केंद्र स्थापन करण्यात आले होते. शहरातील ९० खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये सुमारे १५ हजार विद्यार्थी आहेत. त्याशिवाय क्लास संचालक, इतर स्टाफचीहीसंख्या लक्षणिय आहे. परंतू, पाच दिवसांत ४४८ विद्यार्थी व १४ क्लास संचालक असे एकुण ४६२ जणांचीच आरटीपीसीआर चाचण्या झाल्या. सुदैवाने यातील एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.
खाजगी कोचिंग क्लासेस संचालकांनी पाच दिवसांत त्यांच्या क्लासमधील सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करुन घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले असतानाही कोचिंग क्लासेस संचालकांनी याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळेच १५ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ ४४८ विद्यार्थ्यांच्याच चाणण्या होऊ शकल्या. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागाच्या पथकाचा एक एक मिनीट किती महत्वाचा आहे. याची कल्पना सर्वांनाच आहे. परंतु, मनपाच्या आरोग्य विभागाचे पथक पाच दिवस बसून होते. या पथकाला ज्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळायला हवा होता तो मिळाला नाही, असे वैद्यकीय अधिका-यांचे म्हणणे आहे.
जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध साथरोग प्िरतबंधक कायदा १८९७ अन्वये दिलेल्या तरतूदीनूसार भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नूसार आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ तसेच महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२० च्या तरतूदीनूसार कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे. लातूर शहरातील खाजगी कोचिंग क्लासेस संचालकांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करण्याऐवजी ते आमच्या अधिकारात येत नाही, अशी भूमीका घेणा-यांवर जिल्हाधिणकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जबाबदारीचे भान नसल्याबद्दल नाराजी
लातूर शहर व जिल्ह्यातील खाजगी कोचिंग क्लासेसमधील सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करुन घेण्याची जबाबदारी त्या त्या क्लासेस संचालकांवर जिल्हाधिकारी यांनी टाकली होती. एकीकडे क्लासेस नियमित सुरु करण्याची परवानगी मागीतली जात असताना क्लासेसमधील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करुन घेण्याच्या जबाबदारीचे भान क्लासेस संचालकांना नसावे, याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
चाचणी करुन घेणे आमच्या अधिकारात येत नाही
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी क्लासेसमधील सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करुन घेण्याचे आदेशीत केल्यानंतर खाजगी कोचिंग क्लासेस संचालक यापासून पळ काढत असल्याचे दिसून आले. कोरोनाची चाचणी करुन आमच्या अधिकारात येत नाही. त्यामुळे तशी सक्ती क्लासेस संचालकांवर लादू नये, असे काही खाजगी कोचिंग क्लासेस संचालकांचे म्हणणे आहे.
जेसीबीच्या बकेटमधून गुलाल उधळणा-या उपसभापतीविरुध्द गुन्हा दाखल