26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeलातूरलातूर जिल्ह्यात डेंग्युचे १६ रुग्ण आढळले

लातूर जिल्ह्यात डेंग्युचे १६ रुग्ण आढळले

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव ओसरत असल्याचे दिसत असतानाच आता डेंग्युच्या तापाने नागरिकांची झोप उडवली आहे. ‘डंख छोटा, धोका मोठा’, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आपल्या लहान मुला-मुलींना डेंग्यूच्या डंखापासून कसे दुर ठेवता येईल, याची सतत चिंता पालकांना आहे. लातूर जिल्ह्यात जानेवारीपासून आजपर्यंत १६ डेंग्युचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात ग्रामीणमधील १३ तर लातूर शहरातील ३ रुग्णांचा समावेश आहे. डेंग्यु संशयीत रुग्णांची संख्या ब-यापैकी असल्याने लहान मुलांची पालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.

गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून लातूर जिल्ह्यातील नागरिक कोरोना विषाणुच्या विरोधात लढत आहेत. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन केले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता ब-यापैकी ओसरला असरला असता तरी कोरोनात काही नागरिकांनी आपल्या आप्तस्वकीयांना गमावले. कोरोनाशी लढाई सुरुच असताना आता डेंग्यूचा ताप वाढला आहे. पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची डबके साचले आहेत. शिवाय घराघरातून साठवलेल्या शुद्ध पाण्यात डेंग्युच्या ‘एडिस एजिप्ती’ या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरातील लहान मुलांच्या खाजगी हॉस्पिटलस्मधील वाढत्या रुग्णसंख्येवरुन हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी हाच यावरील उपाय आहे. लातूर जिल्ह्यात जानेवारीपासून आजपर्यंत २११ रक्त नमुने घेऊन त्याची तपासणी नांदेड येथील सेंटीनल सव्हॉयलन्स हॉस्पिटलमध्ये करण्यात आली असता २११ रक्त नमुन्यांपैकी १६ रक्तनमुने डेंग्यु पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील १३ ग्रामीणमधील तर ३ रुग्ण लातूर शहरातील आहेत. तसेच ६४ रक्त नमुने घेऊन चिकुनगुन्याची तपासणी केली असता त्यातील एक चिकुनगुन्या पॉझिटिव्ह आला आहे, असे लातूर जिल्हा हिवताप अधिकारी यांनी सांगीतले.

डासोत्पत्ती होणार नाही, या अनुषंगाने सर्वांनी आरोग्य विभागाने सांगीतलेल्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. डेंग्यूचा संशयीत रुग्ण आढळल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, तसेच शहरातील सर्वच खाजगी हॉस्पिटलसी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या डेंग्यू संशयीत, डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची साथरोग नियंत्रणांतर्गत ही माहिती महानगरपालिका आरोग्य विभागास तात्काळ द्यावी, असे पत्र जिल्ह्यातील सर्व खाजगी हॉस्पिटलस्ना संबंधीत यंत्रणेने दिले आहे. डेंग्यूसह इतर साथरोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी लातूर महानगरपालिका प्रशासनाने लातूर शहरात अबेट व धुरफवारणी मोहीम सुरु करण्यात आली आहे.

डेंग्यू ताप म्हणजे काय?
डेंग्यू ताप हा एडिस डासामुळे पसरणारा विषाणुजन्य आजार आहे. ताप येणे, डोकेदुखी, अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या खोबणीमध्ये दुखणे, पाठदुखी, स्नायुत वेदना, सांधेदुखी ही डेंग्यूची लक्षणे आहेत. डेंग्यूच्या एडिस डासाच्या पायावर पांढरे पट्टे असतात म्हणून त्याला ‘टायगर मॉस्क्यूटो’, असेही म्हणतात. हा डास दिवसा चावतो आणि म्हणूनच केवळ आपल्या घरीच नव्हे तर शाळा, कार्यालये, हॉटेल कोठेही तो चावू शकतो. हा डास लोंबकळणा-या वस्तू उदा: दोरी, लाईटची वायर, छत्री, काळेग कपडे, इतर ठिकाणी विश्रांती घेतो. या डासांची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात. वर्षभरानंतर पाणी उपलब्ध होताच त्यामधून पुन्हा अळी तयार होते. त्यामुळे डास अळी असलेली भांउी घासून पुसून धुवून स्वच्छ ठेवावीत, जेणेकरुन भांड्यांचे पृष्टभागाला चिकटलेली अंडी नष्ट होतील.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या