लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयातील ७८६ ग्रामपंचायतीमध्ये अटल घन वन लागवड पध्दतीने ७८६ ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार असुन नरेगा अंतर्गत बिहार पॅटर्न पध्दतीने जवळपास १६ लक्ष वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वृक्ष हे पाऊस पाडण्याचे, भुगर्भातील पाणी पातळी वाढविणेसाठी सर्वात गरजेची भूमिका पार पाडतात. मातीची होणारी धूप सुद्धा वृक्षांमुळे वाचवली जाते. वृक्षांमुळे अनेक वन्यजीवांचे अस्तित्व टिकून राहण्यास मदत होते. तथापी, अलिकडे होणा-या जंगलतोडीमुळे या वन्य प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे.
इंधनासाठी आणि विविध उद्योगधंद्याच्या स्थापना करण्यासाठी, वृक्षतोड केली जात आहे. त्यामुळे जागतिक तापमानात वाढ होऊन अलीकडे तापमान वाढले आहे. यामुळे वन्य पक्षी आणि प्राणी यांचे जीवन धोक्यात आले आहे. निसर्गाचा समतोल राखणेसाठी ३३ टक्के भुभाग वनक्षेत्र असणे गरजेचे आहे. तथापी लातूर जिल्हयाचा विचार करता हे प्रमाण महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजेच ०.६ टक्के इतके अत्यल्प आहे. वनाचे उदिष्ट गाठले तरच जिल्हयात पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. त्याचाच एक भाग म्हणून स्व. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत जिल्हा परिषद लातूर मार्फत ६० लक्ष वृक्ष लागवडीचे उदिष्ट निर्धारित करण्यात आलेले आहे.
यावर्षी लातूर जिल्हयातील ७८६ ग्रामपंचायतीमध्ये अटल घन वन लागवड पध्दतीने ७८६ ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार असुन नरेगा अंतर्गत बिहार पॅटर्न पध्दतीने जवळपास १६ लक्ष वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने पंचायत समिती स्तरावर यासंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करुन जनजागृती केली आहे. वृक्ष लागवडीकरीता वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग व कृषि विभाग यांचे रोपवाटीकेतून रोपांचा पुरवठा होणार आहे. आणखी गरज भासल्यास खाजगी नर्सरीतूनही रोपांची खरेदी केली जाणार असुन त्यासाठी जि.प.सेस मधुन सर्व पंचायत समितींना १५ लक्ष निधी वृक्ष संगोपनासाठी वितरीत करण्यात आलेला आहे. सर्व ग्रामपंचायतीनी किमान १ घन वन लागवड उपलब्ध जागेत करणे व बिहार पॅटर्न पध्दतीने मनरेगातून किमान २ ते ५ हजार वृक्ष लागवड करुन जोपासना करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पंचायत समिती कडुन दिल्या जाणा-या रोपाईतकीच रोपे ग्रामपंचायतीनी त्यांचे स्वनिधी अथवा १५ वा वित्त आयोगाच्या निधीतून, लोकसहभागातून घेण्याच्या सुचना पंचायत विभागाने केल्या आहेत.