लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे़ २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील २०३३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे मात्र कोरोनामुळे
प्रवेश प्रक्रिया रखडली असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
जिल्ह्यातील १३५ शाळांनी आरटीई प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणी केली होती़ ५ हजार २७४ पालकांनी अर्ज केले होते़ त्यापैकी २ हजार ३३ जणांची पहिल्या फेरीत निवड झाली आहे़ जिल्ह्यात २ हजार १३० जागा आहेत़ पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संदेश प्राप्त झाले असून कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश होणे बाकी आहे़ लॉकडाऊनमुळे प्रवेश प्रक्रिया बंद आहे.
शाळा कधी सुरू होणार, याबाबत निर्णय झाला नसल्याने आरटीईच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी वाट पहावी लागत आहे़ सोडतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे़ शासन स्तरावर सूचना प्राप्त होताच कागदपत्रांची पडताळणी करून पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले़ खरे तर दि़ १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होते; परंतु या वर्षी जानेवारीपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला.
गेल्या ५ महिन्यांपासून कोरोनाच्या विरोधात संपूर्ण जग लढा देत आहे़ आपल्या देशात, महाराष्ट्रात, मराठवाड्यात आणि लातूर जिल्ह्यातही कोरोना पसरला आहे त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष कधी सुरू होईल याची प्रतीक्षा आहे.
Read More एसटी बसच्या पासला मुदतवाढ देण्याचा सरकारचा निर्णय