34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeलातूरलातूर मनपाची २२ कोटी ३१ लाखांची वसुली

लातूर मनपाची २२ कोटी ३१ लाखांची वसुली

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेने शहरातील मालमत्ता धारकांकडील कराची थकीत वसुली मोहीम सुरु केलेली आहे. लॉकडानचे अनलॉकमध्ये रुपांतर झाल्यानंतर दि. ६ ऑगस्ट २०२० पासून ही वसुली मोहीम सुरु करण्यात आली असून गेल्या आठ महिन्यांत २२ कोटी ३१ लाख ७९ हजार ५५ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यात येत आहेत.

शहरातील मालमत्ता कर आणि पाणी पट्टी वसुली हा महानगरपालिकेचा नेहमीच कळीचा विषय राहिलेला आहे. वसुली अभावी महानगरपालिकेसमोर अनेक प्रश्न उभे राहतात. अधिकारी, कर्मचा-यांच्या वेतनासह पाणी पुरवठ्याचे वीजबिल असो की, नागरी सुािधांवर करण्यात येणार खर्च असो आर्थिक अडचणीमुळे हे करणे मनपा प्रशासनाला शक्य होत नाही. ही वस्तूस्थिती लक्षात घेता महानगरपालिकेने सक्तीने वसुली मोहीम सुरु केली आहे. महानगरपालिकच्या ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ या चार क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वसुली मोहीम राबविली जात आहे. याशिवाय मनपाच्या मुख्य कार्यालयातील वसुली विभागानेही विविध पथके तयार करुन वसुलीस प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सध्या शहरात सर्वत्र वसुलीचे काम होत असल्याचे चित्र आहे.

शहरातील ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २८ हजार २२३, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २९ हजार २८९, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २० हजार २७३ तर ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १६ हजार २४९ असे एकुण ९४ हजार २४ मालमत्ताधारक आहेत. या मालमत्ताधारकांकडे १२५ कोटी ३१ लाख ७६० रुपये एवढी थकबाकी आहे. गेल्या आठ महिन्यांत त्यापैकी २२ कोटी ३१ लाख ७९ हजार ३५५ रुपये एवढी वसुली करण्यात आलेली आहे.

दि. ४ मार्च रोजी येथील बाजार समिती परिसरात वसुली मोहीम राबविण्यात आली. महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सुंदर बोंदर, क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी, प्रकाश खेकडे, अंगद शिंदे, विकी खंदारे, विजय शेटे, बावगे, किशोर पवार यांनी ७० व्यापा-यांकडून सव्वातीन लाख रुपयांची वसुली केली.

रिलायन्स भ्रमणध्वनी कंपनीचा मनोरा सील
महानरगपालिकेच्या हद्दीत रिलायन्स भ्रमणध्वनी कंपनीचे वेगवेगळ्या खाजगी मालमत्तेवर १४ भ्रमणध्वनी मनोरे उभारलेले आहेत. या कंपनकडून मागील बाकी ते २०२०-२१ या आर्थिक वर्षापर्र्यंत एकुण ५६४८१७० रुपये येणे बाकी होते. त्यापैकी १६४६६९० रुपयांचा भरणा दि. ५ ऑगस्ट २०२० रोजी केला. उर्वरीत थकीत बाकी ४००१४८० रुपयांचा भरणा करण्याबाबत कंपनीच्या प्रतिनिधीला वारंवार सूचना देऊनही कराचा भरणा न केल्या ने दि. ४ मार्च रोजी येथील गीतांजली मार्केट येथील भ्र्रमणध्वनी मनोरा सील करण्यात आला. ही कारवाई आयुक्त अमन मित्तल, सहाय्यक आयुक्त सुंदर बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली एम. पी. टेंकाळे, समाधान सूर्यवंशी, जी. आय. शेख, मैनोद्दिन शेख, रिजवान मणियार यांनी केली. दि. १० मार्चपर्यंत सदर कंपनीने थकीत कराचा भरणा नाही केल्यास कंपनीचे सर्वच मनोरे सील करण्यात येणार आहेत.

एकत्र मालमत्ता करातून १२ टक्के सूट मनपाचा निर्णय
लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत वास्तव्यास असलेले माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींना मालमत्ता करातून सूट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय लातूर शहर महानगरपालिकेने घेतला असून २५ मार्च २०२१ पर्यंत संपूर्ण मालमत्ता कराचा भरणा करणा-या मालमत्ता धारकांनाही मालमत्ता करामध्ये १२ टक्के सूट देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. नागरिकांच्या हिताचा हा निर्णय घेऊन वचनपूर्ती करणारे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख व संबंधितांचे नागरी कृती समितीसह मान्यवरांनी आभार व्यक्त केले आहे. लातूर शहर महानगरपालिकेने दि. २२ फेब्रुवारी २०२० च्या सभेत १२ टक्के मालमत्ता कर माफीचा ठराव केला होता. मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तसेच लॉकडाऊन लागू झाल्यामुळे त्याचा फायदा केवळ १० ते १५ टक्के लोकांनाच मिळाला होता. जून २०२० पासून हा फायदा मालमत्ता धारकांना मिळत नसल्याने मनपाची एकूण थकबाकी १९० कोटींपेक्षा जास्त झाली आहे.

त्यामुळे १२ टक्के सुटीचा फायदा नागरिकांना मार्च अखेरपर्यंत तसेच पुढील वर्षीचा आगाऊ कर भरणा करणा-यांना जून २०२१ पर्यंत सूट देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीचे माजी सभापती तथा स्थायी समिती सदस्य अशोक गोविंदपूरकर यांनी मनपाच्या सर्वसाधारण सभेपुढे मांडला होता. या ठरावास मंजुरी देण्याबरोबरच बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींना मालमत्ता कर माफी योजनेअंतर्गत लातूर मनपा हद्दीत वास्तव्यास असणा-या माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींना ९ सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार मालमत्ता करात सूट देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर करमाफीस पात्र ठरणा-या संबंधितांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिका-यांकडून दरवर्षी प्रमाणपत्र सादर करावे. सदरील सूट ही केवळ एका निवासी मालमत्तेस लागू राहील.

मालमत्ता कर वगळता इतर सर्व करांचा भरणा करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जे मालमत्ता धारक २५ मार्च २०२१ पर्यंत संपूर्ण कराचा भरणा करतील त्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १४० (अ ) अन्वये एकूण मागणीच्या १२ टक्के व शास्तीमध्ये १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी कराचा भरणा केलेल्या नागरिकांना पुढील वर्षाच्या मागणीमध्ये वजावट देय राहील. २५ मार्च २०२१ नंतर ही योजना रद्द करण्यात येईल. जे मालमत्ता धारक १ जून २०२१ अखेर आर्थिक वर्ष २०२१ – २२ च्या मालमत्ता कराचा आगाऊ भरणा करतील अशा मालमत्ता धारकांना एकूण मालमत्ता कर मागणीवर १२ टक्के सूट देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या नांवावर असलेल्या मालमत्ता करात तसेच फाईव्ह स्टार – सेव्हन स्टार बाबतही मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फाईव्ह स्टार – सेव्हन स्टार मध्ये झाडे लावणे, रेन वॉटर हार्वेस्ंिटग करणा-यांचा समावेश करण्यात आला आहे.

लातूरच्या मालमत्ता धारकांना मालमत्ता करातून सूट देण्याबाबतचे वचन पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले होते. त्या वचनाची पूर्ती करण्यासाठी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, मनपा आयुक्त अमन मित्तल केलेल्या प्रयत्नाबद्दल या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले आहे. लातूरवासियांना ही सवलत उपलब्ध करून दिल्याबद्दल स्थायी समितीचे माजी सभापती अशोक गोविंदपूरकर, मनपा विरोधी पक्षनेता अ‍ॅड. दीपक सूळ, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, नागरी कृती समितीचे बसवंत भरडे, अ‍ॅड. उदय गवारे यांसह मान्यवरांनी संबंधितांचे आभार व्यक्त केले आहेत.

नियमन की वेसण?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या