लातूर : येथील गांधी चौकातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी राज्य सरकारने आकृतिबंध मंजूर केला असून २२३ पदांना मंजूरी दिली आहे. यात विशेष कार्य अधिकारी (प्राध्यापक) एक तर प्रत्येकी चार प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक तर आठ सहायक प्राध्यापकांचा समावेश आहे. पदांच्या निर्मितीअभावी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा सुरु झालेली नव्हती. आता पदनिर्मितीमुळे रुग्णसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे.
सरकारी रुग्णालयांतून मोठ्या आजारांवरील विशेष उपचार मिळत नाहीत, तर खाजगी रुग्णालयांतील या विशेष उपचाराचा खर्च गरजुंना परवडत नाही. मुंबई, पुणे, हैदराबाद, कलकत्ता आदी मोठ्या शहराच्या ठिकाणी जाऊन उपचार घेताना गरजु रुग्णांची परवड होते. यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटूंब कल्याण विभागाच्या वतीने पंतप्रधान स्वास्थ सुरक्षा योजनेतून लातूर शहरात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेला जोडून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु करण्याचा निर्णय घेतला. या हॉस्पिटलसाठी दिडशे कोटींची निधी मंजूर केला. यात केंद्र सरकारचा १२० कोटी तर राज्य सरकारचा हिस्सा ३० कोटी रुपयांचा आहे. या निधीतून लातूर शहरात दोनशे खाटांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी झाली. हॉस्पिटलची उभारणी झाली होती मात्र रुग्णसेवा सुरु करण्यासाठी डॉक्टर व कर्मचा-यांचा आकृतिबंध मंजूर करण्याची गरज होती.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला तीन टप्प्यात विविध पदे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मात्र विविध कारणांने पदांची निर्मिती रखडली होती. कोरोनामुळे पदांच्या निर्मितीला चालना मिळाली. त्यानूसार राज्य सरकारने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी २२३ पदांना मंजूरी दिल्याने रुग्णसेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पदांच्या भरतीनंतर लवकरच हॉस्पिटलमधून रुग्णांना अतिविशेष उपचार मिळण्यास सुरुवात होईल.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या आहेत सुविधा
सुपर हॉस्पिटलमध्ये कार्डियालॉजी, अँजिओप्लास्टी, कार्डिओ थोरेस्टिक सर्जरी (ओपन हार्ट सर्जरी), न्युरोलॉजी (मेंदूचे आजार), न्यूरो सर्जरी (मेंदूची शस्त्रक्रिया), बर्न अॅण्ड प्लास्टिक सर्जरी, नॅफरॉलॉजी (डायलिसीस किडनी), पेड्रियाट्रिक न्यू नेटॉलॉजी (जन्मजात बाळाचे आजार) आदी विविध विशेष उपचारांच्या (सुपर स्पेशालिटी) शाखा आहेत. या सर्व शाखांतून आता रुग्णसेवा सुरु होण्यासोबतच पदवीचेही अभ्यासक्रम सुरु होण्याची शक्यता आहे.