लातूर : प्रतिनिधी
मृग नक्षत्र सुरु होऊन आठ दिवसानंतरही जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. मात्र मंगळवार दि. १४ जून रोजी मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसाने लातूर शहरात हजेरी लावली. तासभर पडलेल्या पावसाने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. लवकरच जोरदार पाऊस पडेल आणि पेरण्यांना सुरुवात होईल, असे शेतक-यांना वाटत आहे. दरम्यान जूनमध्ये आतापर्यंत जिल्ह्यात २८.६ मिलीमीटर पाऊस पडला आहे.
लातूर जिल्ह्यातील पर्जन्यमान हा नेहमीचा चर्चेचा विषय राहिलेला आहे. लातूर जिल्हहा पर्जन्यछायेखालील प्रदेश मानला जात असल्यामुळे लातूर जिल्ह्यात दरवर्षीच पर्जन्यमान कमी, अधिक प्रमाणात असते. गेल्यावर्षी जूनच्या पहिल्या तारखेपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. यंदा मात्र पावसाने चांगलीच हुलकावणी दिली आहे. जिल्ह्याच्या एका भागात जोरदार पाऊस पडत असताना दुस-या भागात पावसाचा थेंबही पडलेला नाही. पाऊसच नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतक-यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. मृग नक्षत्र हे हमखास पाऊस पडणारे नक्षत्र मानले जाते. त्यामुळे मृग नक्षत्र निघाल्यानंतर शेतक-यांच्या पावसाबद्दल आशा, अपेक्षा वाढल्या होत्या. राज्यात काही भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातही लागलीच पावसाला सुरुवात होईल, अशी आशा होती. मात्र मोजक्याच ठिकाणी जोरदार हजेरी लाऊन पाऊस गायब झाला.
यंदा वेळेवर आणि अधिक प्रमाणात पाऊस आहे, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी, तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यामुळे शेतक-यांनी एप्रिल, मे च्या कडक उन्हाची तमा न बाळगता खरीपाच्या पेरणीसाठी मशागत करुन राने तयार करुन ठेवली आहेत. बहुतांश शेतक-यांनी बी, बियाणे, खते खरेदी करुन ठेवली आहत्ो तर काही शेतकरी बियाणे व खतांच्या
खरेदीसाठी पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. आता केवळ पाऊस पडण्याचा अवकाश, शेतकरी पेरणीसाठी धावपळ करण्याच्या तयारीत आहेत. मंगळवारी दुपारी लातूर शहर व परिसरात मृग नक्षत्रातील पावसाने तासभर हजेरी लावली.