22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeलातूरमांजरा नदीच्या दुतर्फा २८ हजार वृक्षांची लागवड होणार

मांजरा नदीच्या दुतर्फा २८ हजार वृक्षांची लागवड होणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा राज्यातील सर्वात कमी वृक्षाच्छादित असलेल्या जिल्ह्यात मोडतो. जिल्ह्यात फक्त अर्धा टक्के एवढे वृक्षाच्छादन आहे. येणा-या काळात हे झपाट्याने वाढविण्यासाठी मांजरा नदीच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्याचा संकल्प असून येत्या दोन आठवड्यात लातूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचा सहभाग घेऊन दहा किलोमीटरची मानवी साखळी तयार करुन एकाच वेळी २८ हजार वृक्षाची लागवड करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली. मांजरा नदीच्या काठावरील गावांचे सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, लातूरमधील महाविद्यालयाचे संस्थाचालक, प्राचार्य यांच्याबरोबर ग्रीन लातूर संकल्पाच्या नियोजन बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, बांबू लागवडीचे प्रणेते माजी आमदार पाशा पटेल, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, उपजिल्हाधिकारी रोहयो नितीन वाघमारे, सहायक वनसंरक्षक (रोहयो व कँपा), उस्मानाबाद, मु. लातूर., विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण हे उपस्थित होते.

राष्ट्रीय स्तरावर मानवी आरोग्यासाठी एकूण ३३ टक्के वृक्षाच्छादित क्षेत्र असणे गरजेचे असल्याने राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. लातूर जिल्ह्यात फक्त अर्धा टक्का एवढे वृक्षाच्छादन आहे. ते वाढविणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. मागच्या काही महिन्यापासून प्रयत्नशील आहेत. आता पावसाळा सुरु असून या काळात अधिकाधिक वृक्षलागवड करण्यासाठी ग्रीन लातूर संकल्प त्यांनी हाती घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून येत्या दोन आठवड्यात लातूर शहरातील दयानंद महाविद्यालय, शाहू महाविद्यालय, बसवेश्वर महाविद्यालय, जयक्रांती महाविद्यालय, कॉकसीट महाविद्यालय आणि इतर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या सहकार्याने मांजरा नदीच्या दुतर्फा १० किलो मीटर मानवी साखळी तयार करून वृक्षलागवडीला सुरुवात करणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे यांनी दिली.

या उपक्रमाची सुरुवात म्हणून मांजरा नदीच्या काठावरील भातखेड, भातांगळी, सोनवती, धनेगाव, रमजानपूर, भाडगाव, उमरगा, बोकनगाव, बिंदगीहाळ, सलगरा, शिवणी या गावात लोकांचे प्रबोधन व्हावे म्हणून जिल्हा प्रशासनाकडून जन जागृती केली जात आहे. यासाठी उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन वाघमारे यांची नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांनी नियुक्ती केली आहे. लातूर जिल्ह्यातील वृक्ष वाढीच्या चळवळीत सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा तसेच प्रत्येक नागरिकांनी स्वत: कमीत कमी तीन वृक्ष लावून संवर्धन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या