लातूर : प्रतिनिधी
गेल्या अडीच तीन वर्षांपुर्वी शेजारी बसलेल्याने साधे खोकलले तरी भिती वाटायची ती ‘कोरोना’ची. कोरोनाविषयी अतिसावधानता त्यावेळी नागरीकांमध्ये दिसून आली. आता मात्र कोरोनाची कसलीच भिती नागरीकांमध्ये दिसून येत नाही. त्याचाच परिणाम प्रिकॉशन डोसवर पडलेला दिसून येत आहे. लातूर शहरातील तब्बल ३ लाख १५ हजार ९४६ नागरिकांनी प्रिकॉशन डोसकडे पाठ फिरवल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
सन २०१९ ने जाता-जाता कोरोनाचा व्हायरस मागे ठेवून काढता पाय घेतला. त्याकाळी संपूर्ण जगाला कोरोनाने आपल्या कवेत घेतले. सर्वत्र हाहाकार करुन टाकले. कोरोनाची पहिली लाट संपुर्ण जगाला नवीन होती. कोरोनाची बाधा झाल्यानंतर बाधित रुग्णांवर काय उपचार करावेत?, असा प्रश्न प्रारंभीच्या काळात वैद्यकीय तज्ज्ञांना पडलेला होतो. कोरोवरील ‘ट्रिटमेंट लाईन’ निश्चित करे करे पर्यंत दुर्दैवाने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. लातूर जिल्ह्यातही कोरोनाच्या पहिल्या लाटेने सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. कोरोनाची दुसरील लाट लातूर जिल्ह्यासाठी भयंकर ठरली. जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासनाने उभी केलेली यंत्रणा या लाटेत तोकडी पडली. ऑक्सिजन, व्हेंटीलेटर बेड तर सोडा साधे बेडसूद्धा दुस-या लाटेत लातूर जिल्ह्यातील रुग्णांना मिळत नव्हते. रुग्णाचे नातेवाईक दिवस-रात्र बेडच्या शोधात या दवाखान्यातून त्या दवाखान्यात फिरताना दिसून यायचे.
कोरोनाची पहिली, दुसरी, तीसरी लाट आली तोपर्यंत कोरोवरील ‘ट्रिटमेंट लाईन’ निश्चित झाली आणि कोरोवरील लसही उपलब्ध झाली. लातूर शहरातील नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर रांगा लावून पहिली लस घेतली. पहिला डोस घेण्यामध्ये नागरिकांत जो उत्साह आणि कोरोनाविषयीची सावधगिरी होती ती दुसरा डोस घेण्यामध्ये कमी झाली. त्यामुळे पहिल्या डोसच्या प्रमाणात दुसरा डोस घेणा-यांची संख्या कमी झाली. कोरोनाची लाट लातूर शहर व जिल्ह्यातून आज ब-यापैकी ओसरली आहे. जनजीवन सामान्य झाले आहे. कोरोनाची लक्षणे कोणामध्ये दिसून येत नसल्यामुळे कोरोनाविषयीची सावधानता (प्रिकॉशन) दिसुन येत नाही. परिणामी प्रिकॉश्.ान डोस घेण्यात प्रचंड उदासीनता दिसून येत आहे.