लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र अंनिस लातूर जिल्हा शाखेच्यावतीने लावण्यात आलेल्या, ३०५ व्या आंतरजातीय सत्यशोधकी विवाहाची २० जून रोजी, मनपाच्या विवाह नोंदणी विभागामध्ये रितसर नोंदणी करण्यात आली. या त्रिशतकोत्तर सत्यशोधकी विवाह नोंद निमित्याने, संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर यांच्या हस्ते, विवाह निबंधक विजया बिडवई यांचा सत्कार करण्यात आला तर, तर नोंदणी कर्मचारी महेश शर्मा यांनी सदर नवदांपत्यांचे गुलाब पुष्प देऊन हृद्य स्वागत केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने हॉटेल अंजनी लातूर येथे, ३ एप्रिलला आशिष लामतुरे व निलिमा चौधरी या उच्चशिक्षीत व कंपनी सेवेत कायम असलेल्या तरुणांचा, हा ३०५ वा आंतरजातीय सत्यशोधकी विवाह ज्येष्ठ समाजवादी नेते अॅड. मनोहरराव गोमारे, संघटनेचे पूर्व राज्य प्रधान सचिव तथा विद्यमान राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे व प्रसिद्ध लेखिका सुनीताताई अरळीकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला होता. तसेच या समई डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेषांकाचे प्रकाशनही, सदर वधू-वरासह निमंत्रित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते. या वेळी अनिरुद्ध लामतुरे व भारती लामतुरे या वर माता-पित्यांचाही प्रत्यक्ष सहभाग होता. शिवाय विशेष बाब म्हणजे गेल्या तीन वर्षामध्ये या लामतुरे परिवारातील, उच्चविद्या विभूषीत अशा तिन्ही कमावत्या तरुणांचे याच संघटनेने आंतरजातीय विवाह लावले आहेत.
संघटनेच्या या वैशिष्टयपूर्ण अशा तीन शतके ओलांडलेल्या या विवाहाची, रितसर नोंदणी मनपा कार्यालयात करण्यात आली. तेव्हा सदर विभागातील श्री महेश शर्मा यांनी नवदाम्पत्याचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यापूर्वी पण अशा बहुतांशी विवाहांच्या कायदेशीर नोंदणी, याच विभागात झालेल्या आहेत. आणि अशा समाज प्रबोधनाच्या कार्यात, सदर विभागाचे सेवाकार्य हे चांगले होत असल्याने, संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर यांच्या हस्ते, विवाह निबंधक विजया बिडवई यांचा विशेष गौरव करण्यात आला.
या विवाहप्रसंगी उतरेश्वर बिराजदार, दिलीप अरळीकर, बब्रूवान गोमसाळे, रामकुमार रायवाडीकर, उत्तमराव लामतुरे, सूरज पाटील, रामराव गवळी, प्रा. डॉ. दशरथ भिसे, अनिरुध्द वाघमारे, शिरीषकुमार शेरखाने, हणुमंत मुंडे, प्रा. अनंत लांडगे, बाबा हलकुडे, श्रावणकुमार चिद्री, मंगलताई बावगे, सुधीर भोसले, शाम वरियाणी, अॅड. डी. एन. भालेराव, नजीउल्ला शेख, बी. आर. पाटील, अॅड.. मधुकर कांबळे, संजय व्यवहारे, रामचंद्र तांदळे आदी उपस्थित होते.
फोटो: १.