लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीण मतदारसंघातील रस्त्यांच्या दर्जोन्नत्तीसाठी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ आशियायी विकास बँक अर्थसहाय्य आणि जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ३८ कोटी ५७ लाख रुपयांच्या कामांना राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. वाढती वाहतूक आणि रस्त्यांची स्थिती विचारात घेवून लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी राज्य सरकारकडे रस्त्यांच्या दर्जोन्नत्तीसाठी पाठपुरावा केला. याची दखल घेवून राज्य सरकारने लातूर तालुक्यातील रस्त्यांसाठी १७.२५ कोटी, रेणापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी ८.८४ कोटी तर औसा तालुक्यातील रस्त्यांसाठी १२.४८ कोटी अशा एकूण ३८.५७ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता दिली आहे.
यानुसार औसा तालुक्यातील रामा २३३ हणमंतवाडी- मळवटी- कासारखेडा ते तालुका हद्द, राममा ३६१ वानवडा- मसलगा- माळकोंडजी- संक्राळ रस्ता, रामा ६८ शिवली- भादा- शिंदेवाडी- उटी रस्ता, रेणापूर तालुक्यातील रामा २४५ रेणापूर- काळेवाडी- बिटरगाव- गरसुळी- तत्तापुर ते प्रजीमा २ रस्ता, लातूर तालुक्यातील रामा २३२- आर्वी नांदगाव- प्रजिमा ०४- साई- गव्हाण ते तालुका हद्द या सुमारे ५० किलोमिटर लांबीच्या रस्त्यांची कामे होणार आहेत. यास मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी आभार मानले.