लातूर : प्रतिनिधी
गेल्यावर्षी जिल्ह्यात जून महिन्यापासून सुरू झालेला पाऊस ऑक्टोबरपर्यंत चांगला पडला. त्यामुळे जिल्ह्यात एप्रिल अखेरपर्यंत पाणी टंचाई जाणवणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारणार्थ जानेवारी ते जून पर्यंतचा ४ कोटी १६ लाख ३५ हजार रूपयांचा टंचाई निवारणाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यात गेल्यावर्षी जवळपास ११५ पेक्षा जास्त अधिग्रहणाद्वारे जून अखेर पर्यत पाणी पुरवठा करण्यात येत होता. जून पासून जिल्ह्यात पाऊस सुरू झाल्याने अधिग्रहण बंद करण्यात आले होते. गेल्यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणी पातळीतही चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे नागरीकांना एप्रिल अखेर पर्यंत पाणी टंचाई जानवनार नाही. मात्र मे महिन्यापासून उन्हाचा काडका वाढल्यानंतर पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. तसेच विहीर, बोअरचे पाणी कमी होऊन नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याची सोय व्हावी, त्यांची हेळसांड होऊ नये म्हणून दि. १ जानेवारी ते जून पर्यंतचा ४ कोटी १६ लाख ३५ हजार रूपयांचा टंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
या आराखड्यात ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या ७ उपाय योजनावर २५ लाख २० हजार रुपये, विहीर, बोअर अधिग्रहणाच्या ३५७ उपाय योजनेसाठी १ कोटी ७७ लाख ७० हजार रुपये, विंधन विहिरी घेण्याच्या ७२ उपाय योजनेसाठी ४३ लाख २० हजार, नळ योजना विशेष दुरूस्ती करण्याच्या १९ उपाय योजनेसाठी १ कोटी ६ हजार रुपये, विंधन विहिरींची विशेष दुरूस्ती करण्याच्या ३५ उपाय योजनेवर ९ लाख २५ हजार रुपये, तात्पुरत्या पुरक नळ योजनेच्या ६ उपाय योजनेसाठी ४२ लाख रुपये, विहीर खोल करणे, गाळ काढणे या ६ उपाय योजनेसाठी १२ लाख रुपये, बुडक्या घेण्याच्या १ उपाय योजनेसाठी १ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता कमी
लातूर जिल्ह्यात गेल्यावर्षी चांगला पाऊस होऊनही एप्रिल ते जून दरम्यान ११५ अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता. या उपाय योजनेवर १० लाख ९८ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यावर्षीही जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तरीही लातूर जिल्ह्यात एप्रिल, मे, जून मध्ये पाणी टंचाई जाणवल्यास त्यावर उपाय योजना म्हणून लातूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने दि. १ जानेवारी ते जून पर्यंतचा ४ कोटी १६ लाख ३५ हजार रुपयांचा टंचाईचा कृती आराखडा तयार केला आहे.