लातूर : लातूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील ७ केंद्रांवर दि. १० ऑगस्ट रोजी ८७१ चाचण्या त्यापैकी ७६ पॉझिटीव्ह, दि. ११ ऑगस्ट रोजी १९७० चाचण्या त्यापैकी १५८ पॉझिटीव्ह तर दि. १२ ऑगस्ट रोजी २१९७ चाचण्या त्यापैकी ८८ पॉझिटीव्ह असे तीन दिवसांत एकुण ५ हजार ३५ व्यक्तिंच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ३२२ व्यक्तिंच्या चाचण्या पॉझिटीव्ह आल्या आहेत. दरम्यान अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांना चाचणी आवश्यक असून इतरांना ऐच्छिक असल्याचे महानरगपालिका आयुक्त देविदास टेकाळे यांनी सांगीतले.
लातूर शहराला कोरोनामुक्त करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या वतीने विशेष चाचणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी पालिकेने ५० हजार चाचण्यांचे उद्दिष्ट ठेवलेले असून शहरात ७ केंद्रावर या चाचण्या केल्या जात आहेत. स्वत:ची चाचणी करुन घेण्यासाठी व्यवसायिकांनी सर्वच केंद्रावर दुस-या दिवशीही गर्दी केली होती. ही गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक केंद्रावर चाचणीसाठी येणा-या व्यावसायिकाला टोकन दिले जात आहेत. त्यानुसार तपासणी केली जात असून व्यवसायिक अत्यावश्यक सेवेतील असल्याची खात्री करुन घेण्यासाठी परवाना तपासला जात आहे. खबरदारीचे सर्व उपाय केले जात असले तरी तपासणी केंद्रावर व्यवसायिकांची अनावश्यक गर्दी दिसून येत आहे.
महानगरपालिकेच्या विशेष चाचणी मोहिमेअंतर्गत निर्धारित ७ केंद्रासह आणखी दोन ठिकाणी बुधवारी एकूण २१९७ व्यावसायिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ८८ व्यावसायिक पॉझिटिव्ह आढळले. भाजी मार्केट परिसरात १५०, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील शिवछत्रपती ग्रंथालयात २७७, यशवंत शाळेत २४९, दयानंद महाविद्यालयात २४६, बसवेश्वर महाविद्यालयात १५०, राजस्थान शाळेत २३१, पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन येथील विलगीकरण केंद्र येथे २४८, समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील विलगीकरण केंद्र येथे ४७७ व औषधी भवन येथे १७० व्यावसायिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ८८ व्यावसायिक कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले.
दि. १३ ऑगस्ट पासून लॉकडाऊन शिथील होत आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक केंद्रावर सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. सध्या किराणा होलसेल व किरकोळ विक्रेते, त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी, भाजीपाला, दुध व फळ विक्रेते, वर्तमानपत्र वितरक,औषध विक्रेते व त्यांच्याकडील कर्मचारी, आरोग्य सेवक, पेट्रोल पंपावरील कर्मचारी, गॅस विक्रेते, पाणी व बर्फ विक्रेते, मांस विक्रेते आणि स्वस्त धान्य दुकानदारांच्या तपासण्या केल्या जात आहेत. अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांसाठी या चाचण्या आहेत. इतर व्यावसायिकांना त्या ऐच्छिक असल्याची माहिती आयुक्त देविदास टेकाळे यांनी दिली.
सातही केंद्र अविरत सुरु राहणार
महापालिकेने निर्धारित केलेले ५० हजार चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सातही केंद्र अविरत सुरु राहणार आहेत. या केंद्रावर येणा-या प्रत्येकाची चाचणी केली जाणार आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांच्या चाचण्या सुरु असून पुढच्या टप्प्यात इतरांच्याही चाचण्या होणार आहेत.उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय चाचणी केंद्र बंद होणार नाहीत,अशी माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली. अँटिजन चाचणी करुन घेणे ही प्रत्येकाच्या सुरक्षिततेची बाब आहे. केंद्र अविरतपणे सुरू राहणार असल्याने केव्हाही चाचणी करता येऊ शकते, असेही महापौर म्हणाले.
चाचणी न केल्यास दंडात्मक कारवाई नाही
शहरात सध्या अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चाचणी आवश्यक आहे. अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांसाठी चाचणी बंधनकारक असून इतरांसाठी खुली आहे पण त्यांच्यावर चाचणी करुन घेण्याचे बंधन नाही. चाचणी न करणा-या कोणत्याही नागरिकावर दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. चाचणी न केल्यास महापालिकेकडून १० हजार रुपये दंड केला जाणार असल्याचे संदेश सोशल मीडियात फिरत आहेत.असा कोणताही दंड प्रस्तावित नाही. कोणत्याही व्यावसायिकावर कारवाई केली जाऊ नये, अशी सक्त ताकीद प्रशासनाला दिलेली असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी सांगितले. दंड होणार नसला तरीही प्रत्येकाने स्वत:ची चाचणी करुन घेणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
देवणी तहसील कार्यालयाचा बदलल चेहरा-मोहरा