लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात यंदा ६ लाख ४१ हजार २५० हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. यामध्ये सर्वाधिक ४ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, ९० हजार हेक्टर क्षेत्रावर तूर पेरणीचे नियोजन आहे. पेरणीसाठी ३ लाख ६७ हजार किवंटल सोयाबीन बियाणे आवश्यक असून शेतक-यांकडे ५ लाख १९ हजार ६०० क्विंटल घरगुती बियाणे उपलब्ध आहे. बियाणे बदलासाठी आवश्यक १ लाख २८ हजार ४५० क्विंटल बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उर्वरित पिकांचे बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे, अशी माहिती खरीप हंगामपुर्व आढावा बैठकीत देण्यात आली.
खरीप हंगामपूर्व तयारी बैठक पालकमंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली. खासदार सुधाकर शृंगारे, खासदार ओमप्रकाश निंबाळकर, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार विक्रम काळे, आमदार रमेश कराड, आमदार सतीश चव्हाण, आमदार सुरेश धस, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार धीरज विलासराव देशमुख, आमदार अभिमन्यू पवार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा कृषी विकास अधिकारी एस. आर. चोले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उपस्थित होते.
खरीप हंगाम हा जिल्ह्यातील शेतक-यांसाठी अतिशय महत्वाचा असून बोगस बियाणे, खतांमुळे शेतक-यांचे नुकसान होवू नये, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. शेतक-यांना दर्जेदार बियाणे, खते वेळेत आणि मागणीनुसार उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. खतांचा तुटवडा भासू नये, यासाठी मागणी आणि पुरवठ्याचे योग्य व्यवस्थापन करावे. जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे सोयाबीनच्या बियाणांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता ठेवावी. घरचे बियाणे वापरणा-या शेतक-यांना उगवण क्षमता तपासणीबाबत मार्गदर्शन करावे. तसेच उगवण क्षमता तपासूनच बियाणे वापरण्याचे आवाहन करावे, असे पालकमंत्री महाजन म्हणाले.
खरीप हंगामासाठी खताचा सरासरी ९६ हजार ५८१ मेट्रिक टन वापर होतो, गतवर्षी १ लाख ५ हजार ५७५ मेट्रिक टन वापर झाला होता. यावर्षी १ लाख १२ हजार २६० मेट्रिक टन खत मंजूर झाले आहे. महिनानिहाय त्याचे वितरण केले जात आहे. नॅनो युरियाप्रमाणेच नॅनो डीएपीचा वापर करण्यासाठीही शेतक-यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. बोगस बियाणे, खतांची विक्री रोखण्यासाठी गुण नियंत्रण पथकांमार्फत आवश्यक कार्यवाही केली जात आहे.
याविषयीच्या शेतक-यांच्या तक्रारी प्राप्त करुन घेण्यासाठी जिल्हा आणि विभागीय स्तरावर नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. तसेच राज्यस्तरावर टोल फ्री हेल्पलाईन सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली. पीक प्रात्याक्षिके, शेतीशाळा, हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण, पिकांची उत्पादकता, नैसर्गिक आपत्तीआदी बाबींचा आढावाही पालकमंत्री महाजन यांनी यावेळी घेतला. शंखी गोगलगायीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी कृषी विभागाने तयार केलेल्या घडीपुस्तिका, भित्तीपत्रकेचे यावेळी विमोचन करण्यात आले.