21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeलातूरएक हजार मुलांमागे ९२५ मुली

एक हजार मुलांमागे ९२५ मुली

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला जन्मलेल्या बालकांच्या संख्येवरुन जिल्ह्याची लिंग गुणोत्तर प्रमाण काढले जाते. नुकताच लिंग गुणोत्तर प्रमाण काढण्यात आले. त्यात एक हजार मुलांमागे मुलींची संख्या ९२५ वर आली आहे. ती धोक्याच्या वळणावर आहे. वंशाचा दिवा मुलगाच हवा ही मानसिकता अद्यापही कायम असल्याचेच या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

सलग दोन वर्षे आरोग्य यंत्रणा कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी व्यस्त होती. त्याचा फायदा वंशाचा दिवा मुलगाच असावा, अशी मानसिकता असणा-यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. सीमावर्ती भागातील कर्नाटक राज्यात काही भागात बेकायदा गर्भलिंग निदान सुरु असल्याची चर्चा आहे. याचा फायदा अनेकजण उचलत असून कर्नाटकात तपासणी करुन महाराष्ट्रात गर्भपात तर महाराष्ट्रात तपासणी करुन कर्नाटकात गर्भपाताची नवी परंपरा सुरु असल्याचेही सांगणयात येत आहे. याचा फटका मुलींची संख्या कमी होण्यात झाला आहे.

नुकतेच काढण्यात आलेल्या लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातून आरोग्य यंत्रणेला सूचक इशाराच ठरत आहे. वंशाचा दिवा म्हणुन मुलाचा हट्ट धरणा-या कुटुंबात एक किंवा दोन मुलींना जन्म देऊन तिस-यांदा गरोदर राहिलेल्या महिलेवर मोठे दडपण असते. यातूनच महिला व कुटूंबाकडून माहिती लपवण्यात येते. अंगणवाडी तसेच आरोग्य केंद्रातून देण्यात येणा-या सुविधांचा लाभ घेतला जात नाही. यामुळे असुरक्षित बाळंतपण व अन्य कारणांनी माता व बालमृत्यूचे प्रमाण वाढते. खरे तर स्त्रीभ्रुण हत्या बेकायदेशीर असताना वंशाला दिवा म्हणुन मुलगा व मुलगी समानच असल्याचे पटवून देण्यात येत असले तरी या स्थितीत मुलींची दिवसेंदिवस कमी होणारी संख्या वेळीच आटोक्यात न आल्यास पुन्हा ती नियंत्रणास येण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. यामुळे आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

एक किंवा दोन मुलीनंतर गरोदर महिलांवर विशेष लक्ष
जिल्ह्यात कळ्या खुडण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे लिंग गुणोत्तर प्रमाणावरुन लक्षात आल्याने आता आरोग्य विभागानेही मोहीम हाती घेतली आहे. एक किंवा दोन मुलीनंतर गरोदर असलेल्या महिलांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. महिलांसह तिच्या कुटूंबियांचे सर्व बाजूने समुपदेशन करण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या