21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeलातूरसर्व सोयी-सुविधांनी युक्त सुंदर वसाहत निर्माण करावी

सर्व सोयी-सुविधांनी युक्त सुंदर वसाहत निर्माण करावी

एकमत ऑनलाईन

लातूर : गौड, राजगौड समाजातील १८ लाभार्थ्यांना सन २०१८ मध्ये २१ लाभार्थ्यांना कबाले वाटप झालेले होते व उर्वरित ४१ लाभार्थ्यांना दि. १८ जून रोजी कबाले वाटप झाले. बाभळगाव ग्रामपंचायतीने या कबाले वाटप झालेल्या भूखंडावर या समाजातील लोकांसाठी सर्व पायाभूत सोयी-सुविधांनी युक्त अशी एक सुंदर वसाहत निर्माण करावी, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले.

बाभळगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित गौड, राजगौड समाजातील लाभार्थ्यांना हक्कविलेख (कबाले) वाटप कार्यक्रमात पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी लातूरचे उपविभागीय अधिकारी सुनील यादव, तहसीलदार स्वप्निल पवार, गट विकास अधिकारी श्याम गोडभरले, सरपंच प्रिया मस्के, उपसरपंच अविनाश देशमुख व सर्व ग्रामपंचायत सदस्य, लाभार्थी व अन्य मान्यवर नागरिक उपस्थित होते. पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, गौड, राजगौड समाजातील लोकांना स्वत:च्या हक्काचे राहण्यासाठी जमीन नव्हती. हे लोक जरी त्या भूखंडावर राहत असले तरी कागदपत्रे त्यांच्या मालकीची नव्हती. त्यामुळे त्यांना इतर शासकीय योजनांचा ही लाभ मिळत नव्हता स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न ही अधूरे होते. परंतु आज या समाजातील जवळपास सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे कबाले वाटप झालेले असून या भूखंडावर ग्रामपंचायतीने रस्ते, पाणी, वीज व कचरा व्यवस्थापन आदी पायाभूत सुविधेचा पुरवठा करावा. ही एक सुंदर व आदर्शवत वसाहत निर्माण होईल याची दक्षता घ्यावी.

ग्रामपंचायतीने त्यांच्याकडे असलेल्या मोकळ्या भूखंडावर यापुढील काळात अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच आज कबाले वाटप होत असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी त्यांच्याच जागेवर कब्जा घ्यावा, इतरांच्या जागेवर अतिक्रमण करु नये, अशी सूचना पालकमंत्री देशमुख यांनी केली. बाभळगाव येथील सर्व नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा झाला पाहिजे. गावातील मुला-मुलीसाठी एक स्वतंत्र अभ्यासिका निर्माण केली पाहिजे. गावातील नालेसफाई करुन गावात स्वच्छता ठेवली गेली पाहिजे. तसेच कच-याचे योग्य व्यवस्थापन झाले पाहिजे याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन गावातील सर्व नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश पालकमंत्री श्री देशमुख यांनी यावेळी दिले.

प्रारंभी तहसीलदार स्वप्निल पवार यांनी सन १९९९ मध्ये तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशान्वये गट नंबर ४५९ मधील ०.८० आर क्षेत्र संपादन करुन त्यावर ६२ भूखंड पाडण्यात आले होते. यापूर्वी ५ जानेवारी २०१८ रोजी या समाजातील २१ लाभार्थ्यांना कबाले वाटप करण्यात आलेले होते; आज उर्वरित ४१ लाभार्थ्यांना माननीय पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते कबाले वाटप केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात गौड समाजातील पाच लाभार्थ्यांना कबाले वाटप करण्यात आले, त्यानंतर प्रशासनाच्या वतीने उर्वरित सर्व लाभार्थ्यांना कबाले वाटप प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमास उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांचे आभार गटविकास अधिकारी श्याम गोडभरले यांनी मानले.

गौड वस्तीतील सिमेंट रस्त्यासाठी साडेसात लाख लाखाचा निधी मंजूर
बाभळगाव ग्रामपंचायतच्या वतीने गौड, राजगौड समाजातील लाभार्थ्यांना पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते कबाले वाटप करण्यात येऊन या वस्तीतील सिमेंट रस्त्यासाठी ग्रामपंचायतीने सात लाख पन्नास हजाराचा निधी मंजूर केल्याची माहिती पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी बोलताना दिली.

इतर गावांतील कबाले वाटपाची कार्यवाही करावी
लातूर तालुक्यातील ज्या गावांमध्ये कबाले वाटपाची प्रकरणे प्रलंबित आहेत ही प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्याबाबत प्रशासनाने मोहीम राबवावी व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जे कबाले वाटप करता येत नाहीत त्याबाबत संबंधित नागरिकांचे प्रबोधन करावे, अशीही सूचना यावेळी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केली.

खाद्यतेलांच्या भाववाढीचे रहस्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या