27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeलातूरबारवांना प्रशासन देणार कृतज्ञतेचा हात

बारवांना प्रशासन देणार कृतज्ञतेचा हात

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
मध्ययुगीन काळात शुद्ध पिण्याचे पाणी वर्षभर जनतेला मिळावे म्हणून अत्यंत कमी बाष्पीभवन होणा-या बारवा विहरीची निर्मिती झाली. मागच्या चार – पाच दशकांत गावागावात आणि शहरात पाणी पुरवठा योजना आल्या आणि ‘गरज सरो वैद्य मरो’, या म्हणी प्रमाणे शेकडो वर्षे तहान भागविणा-या बारवा कचरा कुंडी झाल्या. जिल्हा प्रशासनाने या बारवाचे संवर्धन करायचे ठरवले असून बारवांना प्रशासन कृतज्ञतेचा हात देणार आहे.

बारवाचे शहर रेणापूर, ज्या शहरात १६ बारव विहिरी आहेत. त्या शहरापासून त्या मोहिमेला जिल्हा नगरपरिषद प्रशासन विभागाचे सह आयुक्त रामदास कोकरे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. यावेळी तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, रेणापूर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी मंगेश शिंदे, लातूर देवराईचे प्रवर्तक सुपर्ण जगताप, पत्रकार दीपरत्न निलंगेकर, अभय मिरजकर, डॉ. बी. आर. पाटील यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, प्रसार माध्यमातील वरिष्ठ पत्रकार यावेळी उपस्थित होते.

टोळ्यातून समूहात आणि समूहातून ग्राम व्यवस्थेत मानवी जीवन स्थिर झालं ते पाण्याच्या काठी. माणसांची, जनावरांची तहान भागवणारी व्यवस्था माणूस प्रगत होत गेला तसतशी बदलत गेली. डेक्कन बेल्ट हा पक्क्या अग्निजन्य खडकातला. भुगर्भ स्त्रीस्तरीय रचनाचा आणि प्रखर उष्णतेचा त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पी भवन टाळण्यासाठी ११ व्या शतकापासून राष्ट्रकुट, चालुक्य, यादव यांच्या काळा पर्यंत मोठ्या प्रमाणात बारवा विहिर बांधण्याची व्यवस्था निर्माण झाली. अशा बारवा लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत.

काही गावातील आणि शहरातील बारवा शेकडो वर्षाचा इतिहास सोबत घेऊन अजूनही नांदत आहेत. यांचे वैभव परत येणार नाही पण त्यांनी लाखो लोकांची तहान भागवली, त्या मानवतेच्या दृष्टीने कृतज्ञता म्हणून तसेच आपल्या संस्कृतीच्या वैभवी खुणा म्हणून त्या जपल्या पाहिजेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहआयुक्त रामदास कोकरे यांच्या सहकार्याने हे काम लातूर जिल्ह्यात होणार आहे. भारतीय समाज जल, जमीन आणि जंगल राखण्यासाठी पुढे येतो आहे…या कामी हजारो हात पुढे येऊन जोडले जातील आणि जल संवर्धनाबरोबर आपल्या संस्कृतीचे जतन होणारी ही चळवळ लातूरचा आणखी एक नवा पॅटर्न तयार करील अशी अपेक्षा यावेळी सर्वांनी व्यक्त केल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या