31.9 C
Latur
Monday, January 25, 2021
Home लातूर मतदान प्रक्रियेवर कंट्रोल रुममधून नजर

मतदान प्रक्रियेवर कंट्रोल रुममधून नजर

एकमत ऑनलाईन

लातूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी मंगळवार दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत लातूर जिल्ह्यातील एकुण ८८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून संपुर्ण मतदान प्रक्रियेवर जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रुममधून नजर ठेवली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी जी. श्रीकांत यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी, पोलीस बंदोबस्त आणि कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या पुर्व तयारीची व प्रतिबंधात्मक उपाय योजनांची माहिती देताना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपजिल्हाधिकारी निवडणुक डॉ. सुचिता शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कलम १४४ लागु करण्यात आले आहे. त्यामुळे मतदान केंद्राच्या परिसरात मतदाराशिवाय कोणाला जाता येणार नाही, असे नमुद करुन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले, सर्वच मतदान केंद्र सॅनिटाईज करण्यात आले आहेत. विना मास्क कोणालाही मतदान केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. मास्क नसणा-यांना भारत निवडणुक आयोगामार्फत मास्क दिला जाणार आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मतदान साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पीव्हीआर चौक ते शासकीय महिला तंत्र निकेतनपर्यंतचा बार्शी रस्ता वाहतूकीसाठी बंद राहणार आहे. तसेच १ डिसेंबर रोजीही सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हा रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे.

लातूर जिल्ह्यात एकूण ४१ हजार १९० एवढे मतदार आहेत. त्यात पुरुष ३२ हजार १३३, ९५४ स्त्री तर इतर ३ मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात ८८ मतदान केंद्र आहेत. ११६ दिव्यांग मतदार आहेत. १२ ज्येष्ठ मतदारांच्या घरी जाऊन मतदान करवुन घेण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी निवडणुक डा.ॅ सुचिता शिंदे यांनी दिली. पोलीस बंदोबस्ताची महिती देताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव म्हणाले की, बहुस्तरीय पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. ८ पोलीस उपाधीक्षकांच्या पर्यवेक्षणाखाली ५० पोलीस निरीक्षक, ४८४ पोलीस अंमलदार असणार आहेत. प्रत्येक मतदार केंद्रासाठी दोन पोलीस कर्मचारी, होमगार्डस् असणार आहेत. एकापेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या इमारतीसाठी अतिरिक्त पोलीस कुमक ठेवण्यात आली आहे.

कोविड संशयितांना सर्वात शेवटी मतदान करता येणार
मतदान केेंद्रावर थर्मल स्कॅनिंग केली जाणार आहे. ऑक्सिमीटरने शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाणही मोजले जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथक असणार आहे. या पथका कोविड संशयित मतदार आढळून आल्यास त्यास एक चिठ्ठी दिली जाणार आहे. त्यावर मतदानाची वेळ दिली जाणार असून अशा कोविड संशयित मतदारांचे मतदान शेवटच्या टप्प्यात करुन घेण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले.

गोपनियतेचा भंग करणा-यावर फौजदारी
मतदान केंद्र परिसरात मोबाईल फोन घेऊन जाता येणार नाही. तरिही एखाद्याने मोबाईल फोनसह मतदान केंद्रात प्रवेश केला आणि मतदान करताना फोटो किंवा व्हीडीओ काढून तो व्हायरल केला तर त्यावर गोपनियततेचा भंग केल्यामुळे फौजदारी खटला दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले.

नांदेड जिल्ह्यात महिन्याभराने लॉकडऊन वाढले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या