17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeलातूरलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

एकमत ऑनलाईन

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक आणि व्यापारविषयक नवे पैलू प्रकाशात आले आहेत. पुणे येथील इतिहास संशोधक संस्कृत पंडित श्रीनंद बापट यांनी हे वाचन केले असून लातूर जिल्हा इतिहास संकलन संस्थेने इतिहास दिनानिमित्त आयोजित केलेल्या बेबिनारमध्ये डॉ. बापट यांनी हा नव एैतिहासिक खजिना लातुरकरांना उपलब्ध करुन दिला.

शिलालेख हा अस्सल ऐतिहासिक दस्ताऐवज असतो व त्यातून त्या परिसराचा इतिहास भूगोल उजागर होण्यास मोठा हातभार लागतो. नेमक्या याच कारणापोटी इतिहासकार ग. ह. खरे यांनी राज्यातील अनेक शिलालेखांचे १९३४ साली वाचन केले होते. लातूर येथील पापविनाशक मंदिरातील कल्याणी चालुक्य नृपती सोमेश्वर तिसरा यांच्या काळातील १० फेब्रुवारी ११२८ चा शिलालेखही त्यास अपवाद राहीला नव्हता.

तथापि खरे यांनी केवळ एका बाजुंचे वाचन केले होते उर्वरीत दोन बाजू तशाच होत्या. त्या वाचल्या जाव्यात यासाठी येथील इतिहास अभ्यासकांनी प्रयत्न केले होते. त्यानुसार पुणे येथील शिलालेख अभ्यासक डॉ. श्रीनंद बापट व त्यांच्या सहका-यांनी हे काम हाती घेतले व ते पूर्णत्वासही नेले. या शिलालेखानुसार डॉ. बापट यांनी लत्तलौर ही विद्वतजनांची तेजस्वी नगरी असून ५०० विद्वान येथे वासतव्यास आहेत. प्रजासुख हीच आपली संपत्ती मानणा-या सर्वगुणसंपन्न कल्याणी चालुक्य सोमेश्वराची ही नगरी आहे. ज्याच्या दर्शनाने मनुष्यांना पृथ्वीवरच सिध्दी प्राप्त होतात असा पापविनाशन नावाचा देव येथे आहे.

माधव नायक नावाच्या ब्राम्हणाने पापविनाशक मंदिर उभारण्यापूर्वी त्या परिसरात निळ्या कमळाप्रमाणे भासणारी विशाल पुष्करणी शंकराच्या कृपने बांधली होती. ती बांधतानातच त्याने तेथे शंकराचे मंदिरही उभारले. केवळ इथेच तो थांबला नाही तर पुजाविधीसाठी लागणा-या साहित्याची तरतुद आणि तीच्या उपलब्धतेची जबाबदारीही निश्चित केली होती. यानुसार सर्व व्यापा-यांनी वीस कवड्या सोनारांनी सुपे, फळविक्रेत्यांनी दर दुकानामागे एक सुपारी, कापड विक्रेत्यांनी दरमहा चांदीचे नाणे, तेल्यांनी प्रतीपंधरवाडा एक कोडील (एक प्रकारचे माप) तेल, फळविक्रेत्यांनी प्रती दुकान दोन कवड्या, लोणा-यांनी म्हणजेच चुना उत्पादकांनी दररोज एक चांदीचे नाणे द्यावे, असा नियम होता.

लोणा-यांवरील सर्वाधिक निधीभार पहाता त्याची मिळकतही मोठ्या प्रमाणात असावी, असे डॉ. बापट म्हणाले. विशेष म्हणजे देणगी देणे सर्वांना बंधनकारक होते व ती न दिल्यास दंडही लावण्यात येत असे. लोणा-यांकडून पैशाच्या तसेच नैवैद्याच्या रुपात तर फळविक्रेत्यांना रुईच्या पानाच्या रुपात दंड वसुल केला जाई, असे असे डॉ. बापट म्हणाले.

राज्य दार्शनिका विभागाचे माजी संपादक व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी गणेशवाडी (ता. शिरुर अनंतपाळ) येथील ३० नोव्हेंबर १०९९ शिलालेखावरुन त्या परिसरातील कल्याणी चालुक्य राजवटीच्या तत्कालीन वैभवाची व प्रजाहितार्थ राबवण्यात आलेल्या उपक्रमांची विस्ताराने माहिती दिली. सेनापती भीमनाथाच्या ताब्यात हा परिसर होता. तो कश्मीरचा रहिवाशी होता. त्याने दिलेल्या दानांचे व केलेल्या धर्मकृत्यांचे वर्णन गणेशवाडी शिलालेखातून कळते.

ताने त्रिपुरुष मंदीरे, शाळा, विहीरी, तडाग बांधले. यज्ञयाग केले. अन्नसत्रे चालवली. मंदिराला जमिनी दान दिल्या. तत्पुरुष, वादीरुद्र, क्रियाशक्ती, त्रिलोचनाचार्य पंडित, श्रीकंठमुनी असे पंडित येथे रहात होते. त्यांच्या यम, नियम जप अनुष्ठान, मौन समाधी बद्दलही या शिलालेखातून माहिती मिळते. या शिलालेखातील उल्लेखित गावे लातूर जिल्ह्यातील असल्याने हा शिलालेख लातुरच्या इतीहासात महत्वाची भर टाकणारा असल्याचे डॉ. पाठक यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. संजय वाघमारे यांनी पापविनाशक शिलालेखीत उल्लेखीत ५०० विद्वानांचा संदर्भ लातूर शहरातील पाचशे घर मठाशी आहे का? या पार्श्वभूमिवरही या शिलालेखाचे संशोधन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष डॉ. सदाशिव दंदे यांनी केले. पाहुण्याचा परिचय डॉ. सुनिल पुरी यांनी दिला. सुत्रसंलन प्रा. माधवी महाके यांनी केले तर आभार शहाजी पवार यांनी मानले. हे कार्य व्हावे यासाठी राज्य दर्शनिका विभागाचे सेवानिवृत्त सचिव डॉ. अरुणचंद्र पाठक, तत्कालीन मनपाआयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, महापौर विक्रांत गोजमगुंडे, मंदिराचे पुजारी विष्णुदत्त श्रीमाली (व्यास) उर्फ पप्पू महाराज यांचे सहकार्य लाभले त्याबद्दल संस्थेने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.

भोकर शहराजवळ शर्टने गळा आवळून युवकाचा खून

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या