लातूर : प्रतिनिधी
धम्माचे श्रवण केल्याने आपल्याला मनामध्ये कधीही क्रोध निर्माण होत नाही. पंचशीलाच्या आचरणाने प्रत्येक व्यक्ती हा शीलवान बणतो. आपण आपल्या पंचेंद्रियावर आपले नियंत्रण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन श्रीलंका येथील पू. भिक्खू सुगतवंश महाथेरो यांनी धम्म देसणा देताना केले. बौध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी बौध्द धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व सर्व लातूर येथील बौध्द उपासक, उपासिका यांच्या सौजन्याने लातूर-बार्शी रोडवरील रामेगाव येथील महाविहार, सातकर्णीनगर येथे रविवार दि. २५ डिसेबर रोजी दुपारी १२ वाजता संस्थेचे अध्यक्ष पू. भिक्खु डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली पाचवी अखिल भारतीय बौध्द धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी भिक्खू सुगतवंश महाथेरो यांनी धम्म देसणा देताना बोलत होते.
पुढे बोलताना पू. भिक्खू सुगतवंश महाथेरो म्हणाले की, तथागत भगवान बुध्दाने विश्वाला धम्म दिला. बौद्ध धम्मामध्ये पंचशिलाला महत्व असते कारण यामुळे आपले जीवन समृद्ध आणि आनंदी बनते. जन्म आणि मृत्यु ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. निब्बान आणि निर्वाण याला मानवी जीवनात अत्यंत महत्त्व आहे, असे सांगून शांततापूर्ण जीवन आपण जगले पाहिजे आणि सर्वांनी धम्मवादी बनले पाहिजे यासाठी शिक्षकांचे आपण मार्गदर्शन घेतले पाहिजे असेही ते म्हणाले. धम्म परिषदेचे उद्घाटन पू.भिक्खू सुगतवंश महाथेरो (श्रीलंका) यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पू. भिक्खू धम्मसेवक महाथेरो, अध्यक्ष, अखिल भारतीय भिक्खू संघ शाखा, महाराष्ट्र प्रदेश, (मुळावा) तर मार्गदर्शक म्हणून पू. भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो, अध्यक्ष, बौध्द धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट, लातूर, प्रमुख अतिथी म्हणून खासदार सुधाकर शृंगारे, माजी राज्यमंत्री संजय बनसोडे, सत्कारमूर्ती निलेश श्रीकांत गायकवाड (आयपीएस) आणि संयोजक पू. भिक्खू पय्यानंद थेरो यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक करताना पू. भिक्खू पय्यानंद थेरो म्हणाले की, आपण या वर्षीपासून ही परिषद २५ डिसेंबरला घेण्याचे निश्चित केले आहे कारण हा दिवस बौद्ध धम्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या दिवशी १९२७ ला वर्णव्यवस्थेला पुरस्कृत असणारी मनुस्मृतीची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे जाहीर होळी केली होती तसेच भारतामध्ये लुप्त झालेला बौद्ध धम्मासाठी आजच्या दिवशी सन १९५४ ला बाबासाहेबांचा पुतळा देहू रोडला बसविला. आज स्त्रीमुक्ती दिन आहे आणि विशेष म्हणजे क्रिसमसची आपल्याला सुट्टी आहे. त्यामुळे आपण यापुढे २५ डिसेंबरला कुठलेही कार्यक्रम न ठेवता यादिवशी परिषदेला सहकुटुंब उपस्थित रहावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
त्यानंतर पू.भिक्खू शरणानंद महाथेरो (पाथरी), पू. भिक्खू प्रा. डॉ.खेमधम्मो महाथेरो (मुळावा), पू. भिक्खू डॉ. यशकाश्यपायन महाथेरो (जयंिसगपूर), पू.भिक्खू दयानंद महाथेरो (मुळावा), पू.भिक्खू पय्यातीस्स महाथेरो (शिरसाळा), पू.भिक्खू धम्मनाग थेरो, (हत्याळ, कर्नाटक), पू.भिक्खू करूणानंद थेरो (औरंगाबाद), पू.भिक्खू धम्मानंद थेरो (अनदूर, कर्नाटक), पू.भिक्खू ज्ञानरक्षित थेरो (औरंगाबाद), पू.भिक्खू प्रशिलरत्न गौतम थेरो (गुजरात), पू.भिक्खू धम्मज्योती (औरंगाबाद), पू.भिक्खू धम्म बोधि (औरंगाबाद), पू.भिक्खू पय्यारत्न थेरो (नांदेड), पू.भिक्खू महावीरो थेरो (काळेगाव, अहमदपूर), पू.भिक्खू मुदितानंद थेरो, (परभणी), पू.भिक्खू पय्याबोंथी (खुरगाव, नांदेड), पू.भिक्खू धम्मधर (जालना), पू.भिक्खू सुभूती थेरो (नांदेड), पू.भिक्खू शिलरत्न थेरो (नांदेड), पू.भिक्खू संघपाल थेरो (नांदेड), पू.भिक्खू अश्वजीत थेरो (दाभड, नांदेड), पू.भिक्खू नागसेन (औरंगाबाद), पू.भिक्खू विनयशील (लातूर), पू.भिक्खू नागसेन बोधि (उदगीर), पू.भिक्खू बोधि धम्मा (बेंगलोर), पू.भिक्खू सुमेध नागसेन (बुद्ध लेणी, खरोसा), पू.भिक्खू धम्मसार (किल्लारी), पू.भिक्खू नागसेन सध्दारतन (श्रीलंका), पू.भिक्खू रेवतबोधि (ंिजतूर), पू.भिक्खू संघप्रिय (नांदेड), पू.भंते पय्यावस (पूर्णा), पू.भंते संघरत्न (देवगाव फाटा, सेलू), पू.भंते बुद्धभूषण (दाभड, नांदेड), पू.भंते बुद्धशील (महाविहार, लातूर) आणि पू.भंते इंदवंस (महाविहार, लातूर) यांची धम्मदेसना झाली.
यावेळी प्रमुख अतिथी खासदार सुधाकर शृंगारे, माजी राज्यमंत्री संजय बनसोडे आणि सत्कारमूर्ती निलेश श्रीकांत गायकवाड यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. तसेच पुणे येथून आलेल्या राजू कदम, अमोल कदम या परिवाराने त्यांचा धर्म सोडून बौद्ध धम्माचा स्वीकार केला. त्याबद्दल त्यांचे सर्वांनी अभिनंदन केले. त्यांना डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी त्रीशरण पंचशील दिले. पंचरंगी धम्म ध्वजारोहन, धम्म मिरवणुक, मुख्य ध्वजारोहण, सातकर्णी स्मरणिकेचे विमोचन, प्रमुख धम्मदेसना संपन्न झाली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केशव कांबळे यांनी केले.
या धम्मपरिषदेत पांढरे शुभ्र वस्र परिधान करुन उपस्थित राहुन धम्म परिषदेला मोठ्या प्रमाणात देशभरातूनबौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी परिषदेचे संयोजक भिक्खू पय्यानंद थेरो, सर्व बौद्ध उपासक-उपासिका, प्राध्यापक, डॉक्टर्स, इंजिनियर्स, पत्रकार, वकील संघ, आंबेडकरी पक्ष, संघटना कार्यकर्ते, आजी-माजी मनपा व जि.प.सदस्य, महिला मंडळ, भारतीय बौद्ध महासभा, बौद्ध धम्म परिषद कार्यकारणी, स्वयंसेवी संस्था पदाधिकारी व कार्यकर्ते आणि संयोजन समितीतील सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.