लातूर : प्रतिनिधी
मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने मराठवाड्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचा प्रकल्प लवकरच हाती घेण्याचा मानस असून त्यासाठी परिषदेचा केंद्रीय अभ्यास गट गठित करण्यात येईल, असे प्रतिपादन मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी नुकतेच येथे केले. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या लातूर महानगर शाखेला त्यांनी भेट देऊन लातूर शहराच्या समस्यांची माहिती करुन घेतली. यावेळी सदस्यांनी शहर विकासाच्या अनेक प्रश्नांना ऐरणीवर आणून त्यावर मार्ग काढण्याच्या सूचना केल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या महानगर शाखेचे अध्यक्ष जयप्रकाश दगडे होते.
राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या व्हीएलसी सभागृहात झालेल्या या बैठकीस मराठवाडा जनता विकास परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सोमनाथ रोडे, सहसचिव प्रा. अशोक सिद्धेवाड (नांदेड), सुमंत गायकवाड (बीड) यांचीही उपस्थिती होती. आषाढी एकादशीचा मुहूर्त साधून या बैठकीत परिषदेच्या ‘मराठवाडा विकास पत्रिका’ या मुखपत्राचा प्रथम अंकाचे विमोचनही डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या हस्ते करण्यात आले. या मुखपत्राचे मानसेवी संपादक जयप्रकाश दगडे यांनी मुखपत्राच्या प्रकाशनाखालील भूमिका स्पष्ट करुन मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील विकास प्रश्नांना व परिषदेच्या उपक्रमांना स्थान देण्यात येईल असे स्पष्ट केले. यावेळी अॅड. भारत साबदे, डॉ. बी. आर. पाटील, प्राचार्य बाबासाहेब ठोंबरे, महेंद्र जोशी, अशोक गोविंदपुरकर, प्रा. बी. एस. पळसकर, डॉ. सुरेखा काळे, राजकुमार होळीकर, प्रा. अर्जुन जाधव यांनीही यथोचीत भाषणे करून लातूर शहराच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या महानगर शाखेचे सचिव प्रा. विनोद चव्हाण यांनी महानगरशाखा स्थापनेपासूनचा अहवाल सादर केला. बैठकीचे सूत्रसंचलन परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य प्रा. सुधीर अनवले तर आभार प्रदर्शन किशोर जैन यांनी केले.