रेणापूर : सिद्धार्थ चव्हाण
खरिप हंगामासाठी रेणापूर तालुक्यातील बळीराजा सज्ज झाला असून पेरणीपूर्व शेत मशागतीच्या कामांना वेग आला आहे. सध्या बैलाचे प्रमाण कमी झाल्याने सर्वाधिक ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत केली जाते. तसेच मजुरांना अभाव असुन मजुरीचे दर वाढल्याने आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने शेतीतील कामे उरकण्याकडे शेतक-यांचा अधिक कल दिसुन येत आहे. तसेच पेरणीसाठी लागणारी खते बी-बियानाची जुळवाजुळव करीत आहेत.
रेणापुर तालुक्यात बरेच शेतकरी खरीप हंगामात जेवढे उत्पादन काढतात तेवढेच उत्पादन रब्बी हंगामात काढतात. रब्बीचा हंगाम संपताच तालुक्यात प्रत्येक छोट्यामोठ्या गावातील शेतकरी खरीप हंगाम पूर्व मशागतीची कामे सुरू केली होती ती कामे अंतिम टप्यात आहेत. यंदा डिझेलच्या दरात वाढ झाल्याने ट्रॅक्टर मालकांनी मशागतीच्या कामाच्या दरात वाढ केली आहे. मोजक्या शेतक-यांनी बैलांवर मशागतीची कामे केली तर बहुतांश शेतक-यांनी ट्रॅक्टरवरील मशागत केली.
गेल्या दोन वर्षापासून चांगला पाऊस होत आहे. मात्र, ऐन काढणीच्या वेळेस अतिवृष्टी होत असल्याने शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात जाते. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहे. तरीही न खचता खरिपाची पेरणी करण्यासाठी खताची बि-बियानाची जुळवा जुळव करीत आहे. खताचे भाव वाढल्याने पुन्हा बळी राज्याची कसरत वाढली आहे.