शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
शेती व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले असले तरी आज ही पारंपारिक शेती अवजारे वापरली जातात. खरिप हंगामाच्या पुर्व तयारीसाठी ट्रॅक्टरने नांगरणी केली असली तरी शेतीच्या अंतर्गंत मशागतीसाठी लाकडी औजारांचा उपयोग केला जात असून सध्या ग्रामीण भागात शेती औजारे दुरुस्ती करण्यास वेग आला वेग असून सुतारकाम कारागिरांकडे गर्दी होताना दिसत आहे.
गेल्या काही वर्षापासून शेतीचे यांत्रिकीकरण झाले आहे.वाढलेला बैल बारदाना खर्च, सालगडी व मजुरांची वाणवा होत असल्याने शेतकरी यांत्रिक उपकरणाद्वारे शेती मशागतीसह पेरणी करत आहेत. मात्र यात आज अनेक शेतकरी पारंपारिक लाकी औजारांच्या साह्याने शेती करीत आहेत.पेरणीपूर्व तयारी म्हणून शेतकरी कुळव, फण, तिफण व बैलांच्या खांद्यावरील जू इत्यादी अवजारे तयार करून घेत असून यासाठी शेतकरी वर्ग सुतारकाम कारागिरांकडून औजारे दुरूस्ती व नवीन औजारे करून घेत आहेत.
दरम्यान शिरूर अनंतपाळ तालुक्यात अनेक सुतारकाम करणारी मंडळी पिढ्यानपिढ्या पासून चालत आलेला शेती औजारे बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय करीत आहेत. खरिपाचा हंगाम सुरू झाल्याने, पेरणी, लागवड करण्यासाठी शेती औजारे दुरुस्ती करण्यात येत आहेत. यातून कारागिरांना थोडासा दिलासा मिळत असल्याने लाकडी शेती औजारे दुरुस्ती करणारे कारागीर समाधान व्यक्त करीत आहे.
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने मोठी भरारी घेतली असली तरी ग्रामीण भागातील शेतकरी मात्र आजही पारंपरिक पद्धतीनेच शेती करीत आहेत. यासाठी लागणारी औजारे यांची दरवर्षी दुरुस्ती करण्यासाठी कारागिरांचे त्याला आजही सहकार्य घ्यावे लागत असून यामुळे सुतारकाम कारागिरांच्या हाताला काम मिळून चार पैसे हातात पडत आहेत.