25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरवरुण राजाच्या साथीने युवा कलावंतांचे सुर ताल बरसले

वरुण राजाच्या साथीने युवा कलावंतांचे सुर ताल बरसले

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ८७ वी मासिक संगीत सभा अष्टविनायक मंदिराच्या गणेश हॉलमध्ये झाली. संगीत सभा सुरु होण्याच्या अगोदर पावसाने जोरदार हजेरी लावली. वरुन राजाच्या साथीने गंधर्व कुलकर्णी याचे तबला वादन व चैतन्य स्वामीच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. वरुन राजा बसरत होता. रसिक कसे येणार याची संयोजकांच्या मनाला थोडी हुरहुर वाटत होती. मासिक संगीत सभेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ही संगीत सभा अगदी वेळेवर सुरु करण्याचा आजपर्यंत संयोजकांचा प्रयत्न राहिलेला आहे आणि त्यासाठी रसिकांची ही साथ मिळाली आहे व कलावंतांची ही साथ मिळाली आहे

संगीत सभेला सुरुवात झाली आणि पाहतात तर काय हॉलमध्ये बहुसंख्येने रसिक उपस्थित होते. कारण शास्त्रीय संगीताचे प्रोग्राम ऐकण्यासाठी रसिक आतुरलेले असतात आणि ऐकण्याची रुची वाढवण्याचे कार्य व रसिक निर्माण करण्याचे कार्य मागील ८७ महिन्यापासून आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठानअविरतपणे करत आहे याचेच हे फलित म्हणावे लागेल. या मैफिलीची सुरुवात लातूरमधील युवा कलावंत गुरुवर्य अमर कडतने यांचा पट्टशिष्य ज्याने नुकतीच संगीत अलंकार ही पदवी प्राप्त केली तो गंधर्व कुलकर्णी याच्या तबलावादनाने झाली. लय तालाचे बंधन सांभाळत तबल्यातील विविध घराण्यांच्या बंदिशी ऐकवत रसिकांना मंत्रमुग्ध केले. ज्या पद्धतीने वरुणराजा बरसत होता त्याच पद्धतीने या युवा कलावंताची बोटे तबल्यावर बरसत होती, आपल्या बहारदार वादनाने या युवा कलावंताने अनेक वेळा रसिकांच्या टाळ्या प्राप्त केल्या. विशेष म्हणजे गंधर्वला लहरा साथ संगत त्याचेच गुरुवर्य अमर कडतने यांनी केली.

या मैफिलीचे दुसरे पुष्प गुंफले ते लातूर मधील युवा गायक चैतन्य पांचाळ याचे. लातूरमधील ज्येष्ठ कलावंत पंडित शिवरुद्र स्वामी यांचे पट्टशिष्य असलेले चैतन्य यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग गोरख कल्याण ने केली एकतालामध्ये व त्यानंतर तीन तलावातील बंदिश सादर केली रागाचे शास्त्र सांभाळत केलेला राग विस्तार आलाप, बहलावे, ताना, अशा विविध अंगांनी त्यांनी राग खुलवला आवाजातील निकोपता व स्वतहाच्या मेहनतिची जोड तसेच गुरूंचे मार्गदर्शन या सर्व गोष्टीमुळे चैतन्य ने आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले, यानंतर त्यांनी वातावरणाला पूरक असा सुर मल्हार राग गाण्यासाठी निवडला यामधील तीनतालातील प्रसिद्ध बंदिश ‘बादलवा बरसनको आये’, ही सादर करुन सभागृहामध्ये सुरतालांची बरसात केल. शेवटी पहाडी रागामधील ठुमरी गाउन आपल्या बहारदार गायनाची सांगता केल.यांना तबलासाथ गंधर्व कुलकर्णी यांनी व संवादिनी साथ महेश काकनाळे यांनी अतिशय समर्पकपणे केली व तानपुरा साथ चिरंजीव अधिराज जगदाळे यांनी केली.

लातूरमधील अनंतराव कासारखेडकर यांनी आवर्तन प्रतिष्ठानला १५ हजार रुपयांचा निधी सुपूर्द केला व शास्त्रीय संगीताची आराधना करणारा निसर्ग कुलकर्णी याने आपल्या वाढदिवसानिमित्त पाच हजार रुपयांचा धनादेश आवर्तन प्रतिष्ठानला सुपूर्त केला. या कार्यक्रमासाठी लातूरमधील रसिक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या