लातूर : प्रतिनिधी
जुलै महिना उजाडताच लातूर जिल्हा परिषदेच्या पाणी टंचाईच्या कृती आराखडयाची मुदत संपली आहे. सध्या ना पाऊस, ना पाणी अशी परिस्थिती असताना जिल्हयात १४ गावे, ५ वाडयावर २० अधिग्रहणाद्वारे करण्यात येणारा पाणी पुरवठाही बंद झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.
जिल्हयात जवळपास १४७ मिलीमिटर पाऊस झाला आहे. या अल्प पावसामुळे पेरण्याही ४० टक्याच्यापर्यंत झाल्या आहेत. उर्वरीत ६० पेरण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे. जर जमीनीत पावसाचे पाणीच मुरणार नसेल विहिर, बोअरला कोठून येणार अशी परिस्थिती आहे. यावर्षी जून महिना अखेर पर्यंत पाणी टंचाईच्या झळा जिल्हयात जाणवत होत्या. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींच्याकडून पाणी टंचाइचे प्रस्ताव पंचायत समितीच्याकडे येण्याचे प्रमाणही वाढू लागले होते. जिल्हयातील ३२ गावांसाठी व १२ वाडया, तांडयावरील नागरीकांसाठी पाणी मिळावे म्हणून पंचायत समिती स्तरावर ४९ अधिग्रहाणाचे प्रस्ताव दाखल केले होते.
त्यानुसार लातूर जिल्हयातील अहमदपूर तालुक्यातील १० गावांना व ५ वाडयांना १५ अधिग्रहणाद्वारे, निलंगा तालुक्यातील १ गावास २ अधिग्रहणाद्वारे, तर उदगीर तालुक्यातील ३ गावांना ३ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यास मंजूरी देण्यात आली होती. त्यानुसार ग्रामीण भागातील नागरीकांना २० अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. लातूर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जून पर्यंतचा पाणी टंचाईचा कृती आराखडा मंजूर करून घेतला होता. या आडखडयाची जून अखेर मुदत संपली आहे. त्यामुळे जुलै महिना उजाडताच जिल्हयात सुरू असलेले अधिग्रहणे बंद झाली आहेत. जिल्हयात सध्या ना पाऊस, ना पाणी अशी परिस्थिती आहे.
शासनाकडून मुदतवाढ आली नाही
लातूर जिल्हयातील नागरीकांना अधिग्रहणा द्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. जून पर्यंतच ग्रामीण भागात पाणी पुरवठा मंजूर आराखडयानुसार करण्यात आला. या संदर्भाने शासनाकडून कोणतीही मुदतवाढीची सुचना आली नाही. त्यामुळे अधिग्रहणे बंद करण्यात आली आहेत. सध्या ग्रामीण भागात अधिग्रहणाद्वारे खरच पाणीपुरवठयाची गरज आहे का ? त्या संदर्भाने गटविकास अधिकारी यांच्या मार्फत माहिती घेवून ती शासनाला कळवण्यात येईल, अशी माहिती लातूर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशिष शेलार यांनी दिली.