लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठात दिनांक २५/०१/२०२३ पासून कृषी अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन, साखळी पद्धतीने उपोषण करत आहेत, आज ३९ दिवस झाले तरी अद्याप सरकारने कृषी अभियंत्यांच्या मागण्या संदर्भात काही कार्यवाही केलेली नाही. महाराष्ट्रात दि. ३१ मे २०१७ रोजी स्थापन करण्यात आलेल्या मृद व जलसंधारण विभागात कृषी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना पात्र करावे. जलसंधारणाबाबत तंत्रिका व शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम कृषी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना चार वर्ष शिकविला जातो, त्यात विविध मृद व जलसंधारणाच्या पद्धतीचा वापर करुन पाणलोट क्षेत्राचा दीर्घकालीन विकास करणे व त्यासाठी आवश्यक प्रकल्प अहवाल तयार करुन प्रकल्प राबविणे, मृद व जलसंधारण प्रकल्पाच्या माध्यमातून जमिनीची धूप कमी करणे, पाण्याची उपलब्धता वाढवून नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे, विविध मृद व जलसंधारण प्रकल्पाच्या माध्यमातून जमिनीची उत्पादकता व पर्यायाने शेतक-यांची उत्पन्न वाढविणे यांविषयीची संपूर्ण तांत्रिक माहिती कृषी अभियंत्यांना आहे.
मृद व जलसंधारण विभागातील कामे करण्यासाठी कुशल मनुष्यबळ कृषी अभियंत्याच्या स्वरुपात उपलब्ध असल्यामुळे या विभागातील पद भरतीमध्ये कृषि अभियंत्यांचा प्राध्यानाने विचार करावा व या पदांसाठी स्थापत्य अभियांत्रिकी शाखेसोबत कृषीअभियंत्यानाही पात्र करण्यात यावे व या विभागातील पद भरतीमध्ये कृषी अभियंत्यांचा प्राध्यानाने विचार करावा. देशातील कृषी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या अनेक राज्यात (मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओडिसा, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मिझोराम व मेघालय) या संबंधी कार्यवाही या अगोदरच झालेली आहे. महाराष्ट्र राज्यात लवकरात लवकर कृषी अभियंत्यांचा मृद व जलसंधारण विभागात पात्र करुन भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, अशा कृषी अभियंत्यांच्या मागण्या आहेत.