शिरूर अनंतपाळ : शकील देशमुख
शिरूर अनंतपाळ तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली असून शेतकरी शेतीच्या कामाला लागला आहे. गेल्या दहा दिवसांपासून संततधार पावसामुळे शेतक-यांना कीटकनाशक, तणनाशक फवारणी व आंतरमशागतीची कामे करता आली नाही. आता पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने शिवारात शेती कामांची लगबग सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत असून सध्या तणनाशक व किटकनाशक फवारणीला वेग आला आहे.
तालुक्यात गेल्या दहा दिवसापासून संततधार पाऊस सुरु असल्याने खरीप हंगामातील आंतरमशागतीची कामे खोळंबली होते. त्यात सततच्या पावसाने पिके पिवळी पडली. तर शेतात मोठया प्रमाणात तण आले आहे. आता पावसाने उघडीप दिल्याने दहा दिवसानंतर सुर्यदर्शन झाल्याने शेतकरी सुखावला असून आंतरमशात करण्यात व्यस्त झाला आहे. यंदा शेतक-यांनी सर्वाधिक २३ हजार हेक्टरपेक्षा जास्त सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. यावर्षी सोयाबीनची दोन टप्प्यात पेरण्या झाल्या. त्यात गोगलगाईच्या प्रादुर्भावाने मोठा खर्च करूनही सोयाबीन पीक धोक्यात आले. तर दहा दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने शेतीची सर्व कामे खोळंबून होती. शुक्रवार पासून उघडीप मिळाल्यावर शेतकरी किटकनाशक, तणनाशकसह आंतरमशागतच्या कामाला लागले आहेत.