Wednesday, September 27, 2023

कृषी अधिका-यांनी केली सोयाबीन पिकाची पाहणी

लातूर : लातूर तालुक्यातील रायवाडी येथील अनेक शेतक-यांनी बीबीएफ पद्धतीने सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. या सोयाबीन पिकाची शुक्रवार, दि. ३१ जुलै रोजी कृषी अधिका-यांनी पाहणी केली. सध्या सोयाबीन फुलोरा अवस्थेत असून, काही ठिकाणी सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा व पाने खाणा-या अळीचा एकत्रित प्रादुर्भाव आढळून येत आहे.

या पार्श्वभूमीवर या दोन्ही किडींच्या संयुक्त व्यवस्थापनासाठी ट्रायझोफॉस ४० ईसी १.२५ मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी २ मिली किंवा थायक्लोप्रिड २१.७ एससी १.५ मिली किंवा बीटासायफ्लुथ्रीन प्लस इमिडाक्लोप्रिड ०.७५ मिली किंवा थायमेथॉक्साम प्लस लॅम्बडासायलोथ्रिन ०.२५ मिली या कीटकनाशकांची प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी सुभाष चोले यांनी केले. यावेळी त्यांनी क्रॉपसॅप अंतर्गत विविध किडींचे निरीक्षण नोंदविली आणि कामगंध सापळा वापरण्याचे आवाहनही केले.

कृषि सहायक सूर्यकांत लोखंडे यांच्या प्रयत्नातून रायवाडी गावात शंभर एकरवर बीबीएफ पद्धतीने सोयाबीनची पेरणी झाली. सध्या सोयाबीन चांगले बहरले आहे. या सोयाबीन पिकाची पाहणी कृषी अधिका-यांनी केली.  यावेळी जिल्हा कृषी विकास अधिकारी चोले यांच्यासमवेत पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी नंदकिशोर जयस्वाल, कृषी सहाय्यक सूर्यकांत लोखंडे यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी रायवाडीतील कृष्णात बरदापुरे व वीरेश बरदापुरे यांच्या बावीस एकरवर बीबीएफ पद्धतीने पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली.

याशिवाय अमोल मोहिते यांच्या सोयाबीन पिकाचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी क्रॉपसॅप अंतर्गत विविध किडींचे निरीक्षण नोंदविली आणि कामगंध सापळा वापरण्याचे आवाहन केले याशिवाय एकरी चार पक्षी थांबे बसवावेत. तसेच बाजारातील कीटकनाशके खरेदी करताना काळजी घ्यावी. पक्के बिल घ्यावे. शक्यतो सुरक्षा कीटचा वापर करूनच योग्य मात्रा वापरुन फवारणी करावी, असे आवाहन शेतक-यांना केले.यावेळी सतिश जाधव, मुरलीधर उरगुंडे, श्रीकांत उरगुंडे, शंकर उरगुंडे, संगमेश्वर बोमणे, अमोल मोहिते, कृष्णा मोहिते आदी उपस्थित होते.

Read More  वाळू तस्करांना जिल्हाधिका-यांचा झटका

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या