33.5 C
Latur
Saturday, June 3, 2023
Homeलातूरअल्लाह, आमच्या चुका पदरात घे; चांगुलपणाची आणखी एक संधी दे!

अल्लाह, आमच्या चुका पदरात घे; चांगुलपणाची आणखी एक संधी दे!

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
अल्लाहने, ईश्वराने प्रत्येक माणसाला चांगुलपणासह जन्म प्रदान केलेला आहे. परंतू, मानसांतील द्वेष, मत्सर, लोभ, अहंकार यामुळे चांगुलपणा लोप पावत आहे. एै अल्लहा आम्ही सर्वजण तुझीच लेकरं, आमची चुक तुच पदरात घेणार आहेस, याचा आम्हाला दृढ विश्वास असल्यामुळे आमच्या चुकां माफ करुन पुन्हा एकदा माणुस म्हणून जगण्याची संधी दे, अशी प्रार्थना मुफ्ती साबेर खानसाहेब यांनी अल्लाहकडे केली.

लातूर शहरासह जिल्ह्यात ‘ईद-उल-फित्र’ शनिवार दि. २२ एप्रिल रोजी उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. लातूर शहरातील ईदगाहवर सकाळी ९.३० वाजता मुफ्ती साबेर खानसाहेब यांच्या मागे ‘ईद-उल-फित्र’ची सामुहिक नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी समस्त मानवाच्या कल्याणासाठी अल्लाहकडे दुआ मागीतला. तळपत्या उन्हात मनापासून गहिवरुन अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली. तत्पुर्वी हाफिज मौलाना अब्दुल जब्बार यांचे बयान (प्रवचन) झाले. त्यांनी ‘ईद-उल-फित्र’च्या संदर्भाने कुरआन शरिफने दिलेला संदेश, हदीसमध्ये सांगीतलेला उपदेश आपल्या बयानमध्ये सांगीतला.

आपल्या दुआमध्ये मुफ्ती साबेर खानसाहेब यांनी अल्लाहने मानव ही अतिश्य सुंदर अशी देण दिलेली आहे. अल्लाहने सर्वच जीवांना जन्म प्रदान केलेला आहे. परंतू, मानव ही एक अशी देण आहे, जी आपल्या बुद्धीच्या जोरावर संपूर्ण जगातील जीवांवर आपली हुकूमत ठेवते. अल्लाहने दिलेले शहानपण, बुद्धी चांगल्या कामासाठी व्यतीत करणे अपेक्षीत असताना मानवाकडून मानवावरच एक प्रकारचा सुढ उगवण्याचे अल्लाहला अप्रिय असे कृत्य केले जात आहे. आपल्या देशातही असे प्रकार पहावयास मिळत आहेत. अल्लाहची लेकरंच अल्लाहच्या लेकरांना दु:ख, वेदना देत असल्याचे दिसून येत आहे. अल्लाह आम्हाला सद्बुद्धी दे, भारत पुन्हा सोने की चिडीयॉ म्हणुन संपूर्ण जगात नावारुपाला येऊ दे, अशीही प्रार्थना त्यांनी केली.

पवित्र रमजाना महिना दि. २४ मार्च रोजी सुरु झाला होता. संपूर्ण महिनाभर रोजा करण्यात आला. तराविहची नमाज, प्रार्थना, रोजा, असा ईश्वर भक्तीमय महिना सुरु होता. दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळी चंद्रदर्शन झाले आणि दि. २२ एप्रिल रोजी ईद-उल-फित्र असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानूसार आज सकाळी ९.३० वाजता ईदगाहवर मुफ्ती साबेर खानसाहेब यांच्या मागे ईद-उल-फित्रची नमाज झाली. उन्हाळा असल्यामुळे ईदगाहवर मंडप टाकण्यात आलेला होता. परंतू, नमाजला आलेल्या मुस्लिम बांधवांची संख्या खुप मोठी असल्यामुळे मंडप अपूरा पडला. अनेकांना उन्हाचे चटके सहन करीत ‘ईद-उल-फित्र’ची नमाज अदा करावी लागली. नमाज झाल्यानंतर दुआ झाली. त्यानंतर ‘कुत्बा’झाला आणि सर्वांनी एकमेकांना गळाभेटी देऊन ‘ईद-उल-फित्र’च्या शुभेच्छा दिल्या.

‘ईद-उल-फित्र’निमित्त नवे कपडे, सुरमा, अत्तर, टोपी, रुपाल घेऊन मुस्लिम बांधव अगदी सकाळपासूनच ईदगाहकडे निघालेले होते. युवक, ज्येष्ठ, बच्चे कंपनीचा उत्साह होता. पुरुष मंडळी ईदगाहकडे निघाली, घराघरातील महिला भगिणीही ‘ईद-उल-फित्र’च्या नमाजच्या तयारीला लागली. ईदगाहवर सामूहिक नमाज झाल्यानंतर शहरातील विविध मस्जिदमध्ये नमाज झाला. जे ईदगाहवर पोहोचू शकत नाहीत, अशा ज्येष्ठांसाठी मस्जिदमध्ये नमाजची सोय करण्यात आलेली होती.

ईदगाहवर उपस्थित राहून माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिल्या शुभेच्छा
ईद-उल-फित्र तथा रमजान ईद निमित्ताने लातूर येथील ईदगाह मैदानावर सहका-यांसह उपस्थित राहून राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शनिवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी मुस्लिम बांधवांची पवित्र नमाज आदा झाल्यानंतर भेट घेतली. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी सदिच्छा व्यक्त करून इदगाह मैदानावर उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार सुधाकर श्रृंगारे, शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, पोलिस अधिक्षक सोमय मुंडे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, माजी महापौर दीपक सूळ, विलास को ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, माजी नगरसेवक युनूस मोमीन, गणेश एस. आर. देशमुख, प्रशांत पाटील, अजितसिंह पाटील कव्हेकर, प्रदीपसिंह गंगणे, प्रा. प्रवीण कांबळे, सुंदर पाटील कव्हेकर, अहेमदखान पठाण, आसिफ बागवान, नवनाथ आलटे, हनमंत पवार, किरण बनसोडे, अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, अब्दुल शेख, गोविंद शिंदे आदीसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, मुस्लिम समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या