लातूर : प्रतिनिधी
२०२२ – २०२३ या आर्थिक वर्षात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे नवीन खाते उघडणे, पोस्टाचे नवीन खाते उघडणे, आधार, टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विम्यामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणा-या टपाल विभागातील एकूण २३ कर्मचा-यांचा, अधिका-यांचा सत्कार दि. २३ नोव्हेंबर रोजी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या एमसीवीसी सभागृहात पोस्ट मास्तर जनरल औरंगाबाद क्षेत्र अदनान अहेमद यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माननीय पोस्ट मास्तर जनरल यांनी सर्व जनतेला पोस्ट ऑफिस मधील उपलब्ध सुविधांचा जसे की बचत खाते, सुकन्या समृद्धी खाते, पीपीएफ, आवर्ती ठेव, मुदत ठेव, टपाल जीवन विमा आणि ज्येष्ठ नागरीक बचत योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये उत्कृष्ट काम करणा-या दीक्षा स्वामी, ग्रामीण डाक सेवक नायगाव, निवृत्ती तेलंग, ग्रामीण डाक सेवक डिग्गी, अश्विनी शिंदे, ग्रामीण डाक सेवक आलमला यांचा स्कुटी बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला डाकघर अधीक्षक उस्मानाबाद विभाग, मुख्यालय लातूर डॉ. भगवान नागरगोजे, सहाय्यक डाक अधीक्षक, श्याम गायकवाड, आनंद कवठेकर, श्रीकांत माने, डाक निरीक्षक धनाजी मुंडे, सचिन स्वामी, सुनील नाटकर, अमित गाजरे, तक्रार निरीक्षक आदित्य सिंग, आयपीपीबी ब्रांच मॅनेजर राजेंद्र लटपटे, चंद्रकांत झेंडे, पोस्ट मास्तर भगवान हाळणे, भीमराव पाटील, विकास अधिकारी गोविंद राजे, विपणन कार्यकारी सूर्यकांत गुट्टे व जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवक व टपाल विभागातील इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टपाल विभागाचे जनसंपर्क अधिकारी बी. सी. माळी व सहायक डाकघर अधीक्षक सुनील कोळपाक यांनी केले.