लातूर : प्रतिनिधी
अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीतही महावितरणचे कर्मचारी ग्राहकसेवेसाठी परिश्रम घेत असतात. त्याबदल मी त्यांचे कौतुक करतो, असे गौरवोद्गार लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी काढले. भविष्यातील विजेची आव्हाने पेलताना सौरऊर्जेसह पवनऊर्जा निर्मितीवरही लक्ष केंद्रीत करावे, वीजतारांखालील वृक्षतोड टाळण्यासाठी भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात याव्यात. जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणा-या डीपीडीसी फंडातून अधिकाधिक चांगली वीज विकासाची कामे करण्यात यावीत, अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या.
देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. केंद्र आणि महाराष्ट्र राज्याच्या ऊर्जा मंत्रालय, नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभाग व महावितरणतर्फे उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य महोत्सव ‘पॉवर@२०५४’ साजरा करण्यात येत आहे. दि. २९ जूलै रोजी लातूर येथील डीपीडीसी सभागृहातही महावितरणतर्फे उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता सुंदर लटपटे उपस्थित होते. प्रमुख पाहूणे आमदार अभिमन्यू पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अधीक्षक अभियंता मदन सांगळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, केंद्र सरकारचे प्रतिनिधी नोडल अधिकारी विनय गर्ग, महापारेषणचे कार्यकारी अभियंता अशोक गडदे, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप पुनसे, गणेश सामसे, एचव्हीडीएस योजनेचे लाभार्थी संजय कुठवाडे उपस्थित होते. सुत्रसंचलन उपकार्यकारी अभियंता शैलेश पाटील यानी केले.