औसा : प्रतिनिधी
आमदार अभिमन्यू पवार यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत औसा तालुक्यातील २१ किलोमीटर लांबीच्या ३ रस्ते कामांना मंजुरी देण्यात आली असून गेल्या सात महिन्यात त्यांच्या प्रयत्नातून मतदारसंघातील रस्ते सुधारणा कामांसाठी २५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून मतदारसंघातील विविध रस्ते सुधारणा कामांना गती मिळाली आहे. औसा तालुक्यातील ३ रस्ते कामांना मंजुरी मिळाल्यानंतर कासारसिरसी मंडळातील प्रस्तावित रस्तेही लवकरच मंजूर होणार असल्याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे.
३ नोव्हेंबर २०२२ रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत आमदार अभिमन्यू पवार यांनी मागणी केलेल्या औसा तालुक्यातील १२.२०० किमी लांबीचा ‘राममा -३६१ वानवडा-मसलगा-माळकोंडजी-संक्रांत’, ७.२५० किमी लांबीच्या ‘राममा-५४८ लोदगा-गोंद्री-हासेगाव-हिप्परसोगा-(कातपुर) तालुका हद्द’ आणि १.६०० किमी लांबीच्या ‘रामा-३६१ याकतपूर-जयनगर-किनीथोट-तालुका हद्द’ या ३ रस्त्यांच्या दर्जोन्नती कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. औसा विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा अनुशेष मोठा आहे, सलग २ वर्ष पूरहानी होऊनही आघाडी सरकारने अडीच वर्षांत औसा मतदारसंघातील रस्त्यांकडे साफ दुर्लक्ष केले होते. पण राज्यात जनादेशानुसार भाजप – शिवसेना सरकार सत्तेत आल्यापासून रस्ते सुधारणा कामांसाठी निधीचा ओघ वाढला आहे.
मागच्या ७ महिन्यांमध्ये मतदारसंघातील रस्ते सुधारणा कामांसाठी जवळपास २५० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. अजूनही मुख्यमंत्री ग्राम सडक योजना रस्ते संशोधन विकास कार्यक्रम, जिल्हा वार्षिक योजना निधी, गट ब दुरुस्ती निधी तसेच अर्थसंकल्पीय निधी अंतर्गत मतदारसंघातील अनेक रस्ते प्रस्तावित आहेत, मार्च अखेरपर्यंत आणखीन काही रस्त्यांना मंजुरी मिळणं अपेक्षित आहे. औसा मतदारसंघातील रस्ते सुधारणा कामांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत.