लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे अराध्य दैवत, पंढरीच्या विठुरखुमाईच्या दर्शनासाठी दीड-दोन महिने ऊन-वारा पावसात कशाचीही तमा न बाळगता, वयाचाही विचार न करता लाखोंच्या संख्येने दिंड्या पताका घेऊन आषाढीच्या एकादशीला चंद्रभागेच्या वाळवंटात तमाम भक्तांच्या भक्तीचा महापूर ओसंडलेला. कुणीही कुणाला आदेश देत नाही की सक्ती करीत नाही, तरीही एवढ्या शिस्तीत ठरलेल्या ठिकाणी मुक्काम, भजन-कीर्तन, रिंगण हे पार पडते. थक्क करायला लावणारी वारी एकदा तरी अनुभवावी, यासाठी सर्व स्तरातील भक्त सामील होताना दिसतात.
सगळयांना तिथं जाणं शक्य नसले तरी प्रत्येकजण आपापल्या परिने सावळ्या विठ्ठलाला दिवसभराचा उपवास करुन
साकडं घालीत असतो. मग त्यात कवी तरी कसे मागे राहातील. याच निमित्ताने गेली १५ वर्षे लातूरच्या ‘अविष्कार प्रतिष्ठान’च्या वतीने आषाढीच्या पाऊस कविता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. रविवारीही सायंकाळी ५ वाजता खोरी गल्लीतील वेद प्रतिष्ठानच्या सभागृहात कवी रमेश चिल्ले यांनी काव्य मैफीलीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन व वेद प्रतिष्ठान या संस्थांनीही सभाग घेतला होता. या आगळ्या वेगळ्या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक रमेश चिल्ले होते. प्रमुख पाहूणे म्हणून कवी योगीराज माने यांची उपस्थिती होती. सुरुवातीला सावळ्या विठ्ठलाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलनाने कवी संमेलनाचा प्रारंभ झाला. नंतर काव्य मैफिली रंगतच गेली.
ज्येष्ठ कवी योगीराज माने, गझलकार डॉ. संतोष कुलकर्णी, प्रा. चंद्रशेखर मलकमपट्टे, नरसिंग इंगळे, रामदास कांबळे, विशाल अंधारे, शैलजा कारंडे, नयन राजमाने, अरुणा दिवेगावकर, वृषाली पाटील, विमल मुदाळे, कल्याण राऊत, गोविंद जाधव, नामदेव कोद्रे, अमिता पैठणकर, सविता धर्माधिकारी, गोविंद गारकर आदींनी आपल्या कवितांच्या माध्यमातून भक्तीच्या पावसात श्रोत्यांना भिजवून मंत्रमुग्ध केले. यावेळी वेद प्रतिष्ठानच्या डॉ. मायाताई कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रबद्ध अशा काव्य मैफिलीचे प्रास्ताविक अविष्कारच्या सचिव माधुरी चिल्ले यांनी केले. सुत्रसंचालन अब्दुल गालीब शेख व कवी दयानंद बिराजदार यांनी केले. भाऊसाहेब उमाटे यांनी आभार मानले.