लातूर : खेळाची महाकुंभ म्हणून संबोधली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा सर्वोच्च आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील खेळाडूंनी पदकांचे ध्येय समोर ठेवावे, जेणेकरून त्यांची स्वप्नपूर्ती होईल, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन तसेच लातूर जिल्हा पांिसग व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुलात गुरुवारी सकाळी जागतिक ऑलिम्पिक दिवस साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच विक्रम पाटील, बाळासाहेब चाकूरकर, राष्ट्रीय खेळाडू डॉ. लायक पठाण, साबेर शेख, लिंबराज बिडवे, रामदास नाडे, रहीम शेख, क्रीडा मार्गदर्शक जयराज मुंडे यांची उपस्थिती होती.
ऑलिम्पिक पदकांचे ध्येय समोर ठेवून खेळाडूंनी सर्वतोपरी मेहनत करावी, असे सांगून लकडे म्हणाले की, जिल्ह्याचा क्रीडा विभाग खेळाडूंच्या पाठीशी आहे. यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्यात येईल असेही ते म्हणाले.
माजी क्रीडा शिक्षक बाळासाहेब चाकूरकर यांनी ऑलम्पिक स्पर्धेचा इतिहास सांगत या दिनाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी राष्ट्रीय खेळाडू कृष्णा पोतदार, निलेश पौळ,गजानन आडाने यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र व्हॉलीबॉल क्लबचा माजी खेळाडू संतोष ओवांडकर यांचा पीएसआयपदी निवड झाल्याबद्दलही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश पाळणे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार विभागीय सचिव दत्ताभाऊ सोमवंशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विठ्ठल कवरे, प्रल्हाद सोमवंशी,चेतन हाके, गणेश हाके आदींनी परिश्रम घेतले.