लातूर : प्रतिनिधी
येथील जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेतील अंतिम लढती रंगतदार झाल्या. शनिवारी रात्री झालेल्या या सामन्यात मुलांच्या गटात औरंगाबाद विभागाने अटीतटीच्या सामन्यात लातूर विभागाचा ४ गुणांनी पराभव करीत विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात पुणे विभागाने अमरावतीचा ११ गुणांनी पराभव करीत प्रथम क्रमांक पटकावला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने येथील जिल्हा क्रीडा संकुलात दोन दिवस प्रकाश झोतात १७ वर्षाखालील शालेय कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. मुलांच्या गटात अंतिम सामन्यात औरंगाबादने लातूरला २४-२०, असे नमवित विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात पुण्याने अमरावतीचा ३१-२० असा पराभव करीत बाजी मारली. तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात मुलांच्या गटात अमरावती विभागाने कोल्हापुरचा ४९-३८ असा ११ गुणांनी पराभव करीत विजय मिळविला.
मुलींच्या गटात औरंगाबाद विभागाने अटीतटीच्या लढतीत लताूर विभागाचा ४०-३३ असा सात गुणांनी पराभव करीत तृतीय स्थान पटकावले. तत्पुर्वी उपांत्य फेरीच्या सामन्यात मुलांच्या गटात औरंगाबादने कोल्हापूरचा तर लातूरने अमरावतीचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. लातूर-अमरावती हा सामना निर्धारीत वेळेत ४२-४२ गुणांनी टाय झाला होता. त्यानंतर दिलेल्या पाच चढाईत लातूर संघाने ८-६ अशा फरकाने सामना जिंकला. मुलींच्या उपांत्य सामन्यात अमरावतीने औरंगाबादचा अटीतटीच्या लढतीत तीन गुणांनी पराभव केला. तर पुणे विभागाने लातूरचा ६४-१० असा ५४ गुणांनी एकतर्फी पराभव केला. संघांना कामगार आयुक्त मंगेश झोले यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी जगन्नाथ लकडे, क्रीडा मार्गदर्शक चंद्रकांत लोदगेकर, सुरेंद्र कराड, कृष्णा केंद्रे, सिद्धेश्वर मामडगे यांची उपस्थिती होती. पंचप्रमुख लक्ष्मण बेल्लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप मुसांडे, व्यंकट बोबडे, लालबा कावळे, दिनकर क्षीरसागर, वैष्णवी फावडे, प्रदीप आकनगिरे, सचिन राठोड, दीपक हिंगणे, संतोष कोल्हे, सोहेल शेख, अमोल कदम, आशिष येलाले, महेश खरोसे, ऋषिकेश पांचाळ, सोनू जाधव या पंचांनी काम पाहिले. तांत्रिक समितीत धर्मपाल गायकवाड, शंकरराव बुड्डे, बाळासाहेब चाकुरकर, कल्पना टप्पेकर यांनी परिश्रम घेतले.