देवणी : देवणी तालुक्यात झालेल्या ३४ ग्रामपंचायत निवडणुकीतील १६ गावातील ५६ उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चाचा हिशोब संबंधित कार्यालयात वेळेत दाखल करण्यात आले नसल्याची माहिती तहसीलदार सुरेश घोळवे यांनी दिली. जानेवारीत तालुक्यातील ३४ गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला यापैकी एक कमालवाडी येथील निवडणूक बिनविरोध पार पडली तर उर्वरित ३३ गावांत ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराने जो खर्च केलेला आहे तो वेळेत येथील निवडणूक विभाग तथा उपकोषागार कार्यालयात विहित नमुन्यात दाखल करणे आवश्यक होते.
याविषयी निवडणूक विभागातर्फे निवडणूक लढविणा-या उमेदवारांना सूचनाही देण्यात आल्या होत्या मात्र निवडणुका होऊन दीड महिना झाला तरीही १६ गावांतील ५६ उमेदवाराने आपले निवडणूक खर्च हिशोब वेळेत दाखल केला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. हिशोब न देणा-या उमेदवाराची माहिती जिल्हा प्रशासनास लेखी स्वरूपात कळविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
वेळेत हिशोब सादर न केलेल्या उमेदवाराची गाव निहाय संख्या पुढील प्रमाणे. वेळेगाव ९, तळेगाव ७, संगम ७, कोंडाळी १, लासोना ३, वलांडी १, गुरदाळ २, धनेगाव २, जवळगाव ३, इंद्राळ ५, कवठाळ २, बोळेगाव ३, अंबानगर ४, होनाळी १, गोंडगाव ४, व डोंगरेवाडी २ असे असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे