26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeलातूरबांधकाम कामगार कार्यालया विरोधात वडार समाजाचे जागरण गोंधळ आंदोलन

बांधकाम कामगार कार्यालया विरोधात वडार समाजाचे जागरण गोंधळ आंदोलन

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात वडार समाज एवढ्या मोठ्या संख्येने असूनही अद्यापही बांधकाम कामगार नोंदणीच्या संदर्भात जाणीव पूर्वक दूरच ठेवण्यात आले आहे, असे म्हटले तर वावगे ठरु नये. बरेच कामगार ऑनलाईन नोंदणी करुनही कार्यालयातील अधिका-यांनी काही ना काही त्रुटी काढून त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे या कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या बांधकाम कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेद्वारा सातत्याने अनेक वेळा निवेदने देऊन आणि वारंवार कार्यालयातील अधिका-यांना भेटून माहिती देऊनदेखील यावर कोणतीच पावले उचलण्यात आली नाहीत,

त्यामुळे अधिका-यांचे लक्ष वेधण्यासाठी या बांधकाम कामगार अधिका-यांच्या मनमानी कारभारा विरोधात दि. ६ जुलै रोजी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. श्रीकांत मुद्दे यांनी केली आहे. ब-याच बांधकाम कामगारांनी २०१९ साली नोंदणी असूनही आणि ५००० रुपयाचा फॉर्म भरून देऊनही अद्यापही ५००० रुपये खात्यावर जमा झाले नाहीत. याविषयी मागील दोन वर्षापासून वारंवार माहिती आणि निवेदने देऊनही कसलीच अंमलबजावणी झाली नाही उलट अधिका-यांकडून वरच्या कार्यालयात भेटा नाही तर तिकडच्या कार्यालयात जाऊन भेटा अशा प्रकारचे दमछाक करुन नाहक त्रास देण्याचा प्रयत्न झाला. अनेक योजनांचा लाभ वडार समाजातील बांधकाम कामगारांना मिळत नसल्याने हजारो बांधकाम कामगार हवालदिल झाले आहेत.

वडार जमातीचा मुख्य व्यवसाय दगड, मातीशी संबंधित असल्यामुळे पिढ्यानपिढ्यांपासून वडार समाज बांधकाम कामगार म्हणून काम करत असूनही अद्यापही बहुतांशी कामगारांची नोंदणी झालेली नाही आणि ज्यांची झाली आहे त्यापैकी ब-याच कामगारांची नोंदणी होऊन आणि कामगार पासबुक मिळूनही जाचक अटींमुळे ञुटी काढून लाभापासून वर्षानुवर्षे वंचित ठेवण्यात आले आहे. यामुळे बरेच कामगार नोंदणीच्या संदर्भात निराश होऊन याविषयी उत्सुक नाहीत. ग्रामीण भागातही यापेक्षा वेगळे असे चित्र काही नाही. ग्रामीण भागातील बांधकाम कामगार नोंदणीच्या संदर्भात बरेच ग्रामसेवकांना वारंवार विनवणी करुनही सही आणि शिक्का देण्यास टाळटाळ करत आहेत यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश वडार समाजातील युवकांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी होऊ शकली नाही. एकूणच दलालांमार्फत नोंदणी असलेल्या कामगारानाच मदतीचा फायदा होणार असेल तर, अर्ध्यापेक्षा जास्त गरीब वडार समाजातील बांधकाम कामगार वंचित राहतील असेही यावेळी सांगितले.

ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी २०१९ साली झाली परंतु ज्यांनी ५००० रुपयाचा फॉर्म भरुनही ज्यांना लाभ मिळाला नाही अशांना लाभ मिळावा. ज्या बांधकाम कामगारांना अद्याप पेटी मिळाली नाही त्यांना तात्काळ पेटी वाटप करण्यात यावे. विशेषत: बांधकाम कामगारांमध्ये वडार समाजाचा मोठ्या प्रमाणात समावेश असूनही अत्यंत तुटपुंजी लाभ मिळाला, अजूनही बहुतांशी कामगार लाभापासून वंचित आहेत. याची चौकशी करुन त्यांची नोंदणी व्हावी अन्यथा काहीही चौकशी न करता नोंदणी रद्द करु नये. बरेच कामगारांचे नाहक त्रुटी काढून लाभापासून वर्षानुवर्षे वंचित ठेवण्यात आले आहेत. त्यांनाही लाभ मिळावा. अधिका-यांमार्फत बांधकाम कामगार विषयी वेळोवेळी योग्य ती माहिती मिळावी.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या