लातूर : प्रतिनिधी
समाज कल्याण विभाग लातूर, सह्याद्री देवराई आणि लातूर वृक्ष चळवळ यांनी एक अभिनव उपक्रम सुरु केला असून, त्यासाठी समाज कल्याण लातूर यांच्या ३५० पेक्षा जास्त शाळा, वस्तीगृह, दिव्यांग शाळांमध्ये बी बँक व वृक्ष बँकेची स्थापना आज करण्यात आली. राज्यातील असा हा पहिलाच प्रयोग आहे. आता यापुढे झाडे विकत
आणण्याची गरज नाही. त्यासाठी प्रत्येक शाळेने स्वत:ची बी बँक आणि वृक्ष बँक उभी केली आहे.
या माध्यमातून प्रत्येक शाळांनी वस्तीगृहामध्ये किमान येणा-या वर्षभरात पाचशे ते हजार रोप, झाडे तयार होतील. या माध्यमातून साडेतीनशे शाळा वस्तीगृह मध्ये जवळपास लाखो रोपे तयार होऊ शकतात. शहरातील काँक्सीट महाविद्यालय येथे कल्याण विभाग लातूर यांच्यातर्फे आयोजित कार्यशाळेत बी व वृक्ष बँकेची सुरुवात करण्यात आली. समाज कल्याण विभाग लातूर यांच्या वतीने पर्यावरण आणि मैदानी खेळांचे महत्त्व वाढावे म्हणून जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक वस्तीगृह प्रमुख यांची एक कार्यशाळा कॉक्सीट महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशटवार यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. ते बोलताना म्हणाले झाडातील तरंगाबाबत आणि झाडातील उर्जेबाबत आपण जाणले पाहिजे. पृथ्वीवरील या ऊर्जेमुळेच आपले अस्तित्व आहे. ही जाणीव आपल्याला झाली पाहिजे. शाळा , वस्तीगृह झाडांनी , पक्ष्यांनी भरलेले असावे. आपल्या भोवतालचे वातावरण प्रदूषणमुक्त राहावे असे प्रत्येकाला वाटते यासाठी प्रत्येकांनी किमान तीन तरी झाडे लावावीत.
सहाय्यक आयुक्त शिवकांत चाकूर्ते यांनी पर्यावरणाचे महत्त्व समजावे आणि आपल्या प्रत्येक युनिटमध्ये ही वृक्ष चळवळ उभी राहावी यासाठीच आम्ही सर्व एकत्र जमलो असे मत व्यक्त केले. पर्यावरणाविषयी मार्गदर्शन करताना प्रमुख मार्गदर्शक म्हणून लातूर वृक्ष चळवळ व सह्याद्री देवराई लातूरचे समन्वयक सुपर्ण जगताप म्हणाले की, सह्याद्री देवराईचे मुख्य सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज आपणाला प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत त्यांची स्वत:ची त्यांची एक वृक्ष चळवळ निर्माण करावयाची आहे.
डॉ. बी. आर. पाटील यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी मागील तीन वर्षापासून लातूर जिल्ह्यात डोंगरावर जाऊन ४५ हजार झाडांची सह्याद्री देवराई पावसाच्या पाण्यावर कशी जगवली याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये रेणापुर येथील एका आश्रम शाळेमध्ये सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरीष्ठ समाज कल्याण निरीक्षक अशोक गोडबोले यांनी केले तर आभार प्रदर्शन निलेश राजेमाने यांनी केले.