पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशन रोड ते ग्रामपंचायत दरम्यान व्यापारी व नागरिकांना भीक मागत ‘भीक मागो’ आंदोलन करण्यात आले.
सध्या पानगावात कोरोनाचे संकट असल्याने पानगाव ग्रामपंचायतीने सर्व सुविधांकडे लक्ष देणे गरजेचे असतानाही पानगाव गावात अनेक भागांत लाईट नाही.त्यामुळे येथील नागरिकांना अंधारातच वावरावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात मनसेच्या वतीने ग्रामविस्तार अधिका-यांना विचारणा केली असता त्यांनी आमच्याकडे निधी उपलब्ध नसल्याने आम्ही काहीच करूशकत नाही, असे बेजबाबजारपणे उत्तर दिले.
तसेच मनसेच्या वतीने निवेदनाद्वारे तसेच तोंडी अनेक वेळा अपंगांच्या निधी वितरणासंदर्भातही ग्रामपंचायतीस विचारणा केली परंतु ग्रामविस्तार अधिकारी व सरपंच हे निधीचे कारण सांगून गेल्या तीन वर्षांपासून टाळाटाळ करीत आहेत. नाले सफाई अनेक दिवसांपासून न केल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
पानगावत डेंगूचाही रुग्ण आढळला आहे परंतु डेंगूचा रुग्ण आढळूनही पानगाव ग्रामपंचायतीला जाग आली नाही. ग्रामपंचायत यासाठीही निधीचेच कारण देत नालेसफाई करायला तयार नाही म्हणूनच या महत्त्वाच्या कामासाठीही ग्रामपंचायतीकडे जर निधी नसेल तर अशा ग्रामपंचायतीचा निषेध म्हणून मनसेच्या वतीने भीक मागो आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात भीक लागलेल्या ग्रामपंचायतीस सहाय्य म्हणून पानगाव येथील नागरिकांनी भीक स्वरूपात ४४५४ रुपये दिले. हा नागरिकांकडून जमलेला निधी घेऊन मनसे कार्यकर्ते ग्रामपंचायतीकडे गेले होते परंतु त्या अगोदरच हा निधी घेण्याची लाज वाटल्याने सुट्टी नसतानाही ग्रामपंचायतीस कुलूप लावून ग्रामविस्तार अधिकारी गायब झाले होते.
त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी या जमलेल्या पैशाचे व त्यात आणखी पैसे घालून लीड बल्ब विकत घेऊन जेथे अत्यावश्यक आहे तेथे लावण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात शुभम मोतीपल्ले, राम वालेकर, विशाल भिसे,अनंत वालेकर,सतीश डोणे, हसन, विष्णू डोणे, नागेश गायकवाड बालाजी हनवते आदींनी सहभाग घेतला.
बाभळीच्या बॅक वॉटरमुळे पिकांचे नुकसान;आठ वर्षापासून मावेजा मिळेना