लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरात महाकाल प्रतिष्ठानच्या वतीने भगवान महादेव- पार्वतीचा विवाह सोहळा अर्थात ‘भोले की बारात’ काढून अत्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक स्वरुपात आगळ्यावेगळ्या पध्दतीने महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. महाशिवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून पापविनाश मंदिरापासून सर्व भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेणा-या ‘भोले की बारात’ ची सुरुवात झाली. यामध्ये महादेव-पार्वतीसह भगवान विष्णू-लक्ष्मी, ब्रम्हदेव – सरस्वती, चंद्रदेव – सूर्यदेव, नारदमुनी यासह अनेक साधू संत, अघोरी, भूत, पिशाच्च यांच्या वेषभूषेसह भाविक भक्त या बारातीमध्ये सहभागी झाले होते. या बारातीमध्ये भोले की फौज, करेगी मौज, हर हर महादेव, ओम नम: शिवायचा जयघोष आसमंत दणाणून टाकत होता. या बारातीमध्ये सामील करण्यात आलेली नंदी व महादेव-पार्वतीची भव्य मूर्ती गुजरातनंतर महाराष्ट्रात लातूरमध्ये प्रथमच शोभायात्रेत आणली गेली. या मूर्तीच्या सौंदर्याने लातूरकरांना अक्षरश: भुरळ पाडली.
बारातीचा सुखसोहळा लातूरच्या भाविक भक्तांनी आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यास प्रचंड गर्दी केली होती. शहरातील पापविनाश रोड, सेंट्रल हनुमान, औसा हनुमान, गांधी चौक, हनुमान चौक, गंज गोलाई, भुसार लाईन, सुभाष चौक खडक हनुमान मार्गे ही बारात पापविनाश मंदिरात पोहचली. या आगळ्यावेगळ्या बारातीने संपूर्ण लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले. ‘भोले की बारात’ आपल्याला पाहायला मिळाली, हे आपले अहोभाग्य असल्याच्या प्रतिक्रिया लातुरातील अनेक शिवभक्तांनी व्यक्त केल्या. या संपूर्ण उत्सवाच्या यशस्वीतेसाठी महाकाल प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिका-यांनी तसेच सर्व शिवभक्तांनी परिश्रम घेतले.