30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeलातूरबीएसएनएलने महावितरणच्या सहकार्याने तोडली झाडे

बीएसएनएलने महावितरणच्या सहकार्याने तोडली झाडे

एकमत ऑनलाईन

लातूर : येथील टेलिफोन भवनमधील तीन मोठी झाडे बीएसएनएल व महावितरण या दोन विभागाच्या सहकार्याने रविवार दि़ १२ जुलै रोजी तोडण्यात आली़ महावितरणच्या उच्चदाब वाहिनीच्या तारांना या झाडांमुळे अडथळा होत होता, असे सांगीतले असेल तरी झाडाच्या फांद्या तोडण्याऐवजी झाडे बुडापासून साफ करण्यात आली आहेत.

येथील टेलिफोन भवनच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे आहेत़ गेल्या अनेक वर्षांपासूनची ही झाडे आहेत. त्यात निलगीरी, सुबाभूळ, इंग्रजी चिंच, इतर काटेरी झाडांचा समावेश आहे़ झाडांमुळे टेलिफोन भवनचा परिसरात हिरवागार आहे. या भवनच्या प्रवेशद्वारावरच महावितरणचे ट्रान्सफार्मर आहे. झाडे मात्र टेलिफोन भवनच्या कंपाऊंडच्या आत आहेत.

या ट्रान्सफार्मरवरुन उच्चदाब वीज वाहिनी गेलेली आहे. टेलिफोन भवनच्या आतील झाडांच्या काही फांद्या या उच्चदाव वीज वाहिनीच्या तारांना स्पर्ष करीत होत्या हेही खरे आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. वारा, वादळ सुटत आहे़ कधी मोठा पाऊस आणि वादळ येईल आणि या झाडांच्या फांद्यांमुळे उच्चदाब वीज वाहिन्यांच्या तारांना अडथळा निर्माण होईल, हे सांगता येत नाही. हे जरी खरे असले तरी तारांना स्पर्श करणा-या फांद्या तोडण्याऐवजी झाडे बुडापासून तोडण्यात आली.

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एकीकडे वृक्षारोपण मोठ्याप्रमाणात केले जात असताना दुसरीकडे मोठी झाडे बुडापासून तोडण्यात आली़ रविवार सुटीचा दिवस असला तरी झाडे तोडण्यासाठी कटर, क्रेन, मोठा दोन टेम्पो आणि मोठा मनुष्यबळ अशी यंत्रणा झाडे तोडत होती़ तीन मोठी झाडे तोडून त्यांचे खोड, फांद्या, क्रेनच्या सहायाने टेम्पोत टाकण्यात आले. तोडलेल्या झाडेच खोडं आणि फांद्यांनी अक्षरश: मोठे दोन टेम्पो भरले होते.

झाडे तोडण्याची परवानगीच घेतली नाही
टेलिफोन भवनच्या परिसरातील तीन झाडं तोडली जात असताना महानगरपालिका प्रशासनाला याचा थांग पत्ता नव्हता़ महानगरपालिका प्रशासनाला अंधारात ठेवून ही झाडे तोडली गेली़ झाडे तोडण्याबाबत महानगरपालिकेकडून कसलीही परवानगी घेण्यात आलेली नाही किंवा आम्ही तशी परवानगी दिलेली नाही, असे महानगरपालिकेच्या संबंधीत अधिका-याने सांगीतले.

महावितरणचे सहकार्य, यंत्रणा बीएसएनएलची
महावितरणचे उच्चदाब वीज वाहिनी बंद केली आणि बीएसएनल पैसे खर्च करुन मोठी यंत्रणा उभी केली आणि तीन झाडे बुडापासून तोडण्यात आली़ सोमवार ते शुक्रवार वर्किंग डे असतात़ या कालावधीत अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहकही टेलिफोन भवनमध्ये मोठ्याप्रमाणात असतात. महावितरणच्या तारांवर वाकलेले झाड वादळी पावसाने तारांवर पडले असते तर मोठा अपघात झाला असता. त्यामुळे थांबणे शक्य नव्हते म्हणून रविवार सुटीच्या दिवशी झाडे तोडण्यात आल्याचे अनिलकुमार बनसोडे म्हणाले.

आम्ही फक्त सहकार्य केले झाडे बीएसएनएलनेच तोडली
आम्ही फक्त वीज वाहिनी बंद करण्याचे सहकार्य केले. झाडे टेलिफोन भवनच्या परिसरात होती ती बीएसएनएलनेच तोडली, असे महावितरणच्या एका अधिका-याने या संदर्भात बोलताना सांगीतले.

संभाव्य अपघात टाळण्यासाठीच झाडे तोडली
टेलिफोन भवनच्या परिसरातील तीन झाडं तोडण्यात आली़ त्यातील एक झाड महावितरणच्या उच्चदाव वाहिनीच्या तारांवर झुकलेले होते़ वादळी पावसात हे झाड तारांवर पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती़ त्यामुळे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना ही बाब लक्षात आणुन दिल्यानंतर त्यांनी झाडे तोडण्यास सहकार्य केले़ इतर दोन झाडं वाळलेली होती़ रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे ही झाडे तोडण्यात आली़ झाड तारांवर पडून मोठा अपघात होण्याची शक्यता असल्यामुळेच ही झाडे तोडण्यात आली, असे बीएसएनएलचे महाप्रबंधक अनिलकुमार बनसोडे यांनी सांगीतले.

Read More  रविवारी जिल्ह्यात ४४ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या