लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील बोकनगाव देवीच्या मंदिर येथे असलेल्या सह्याद्री देवराई बोकनगाव म्हणून परिचित असलेल्या डोंगरावर पायथ्यापासून माथ्यापर्यंत वृक्षदिंडी काढून सर्वांनी वृक्षांचे रोपण केले. अतिश्य वातावरणात वडाच्या नावाने चांगभलं, पिंपळाच्या नावाने चांगभलं घोषणा देत दिंडीची सुरुवात झाली. सह्याद्री देवराईचे लेखक कवी अरविंद जगताप यांच्या कवितेने झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे, हे सर्वांनी एक सुरात म्हटले. निसर्गोत्सव साजरा करुन फुलपाखरांचे, मद्यमाश्यांचे ऋण व्यक्त करण्यात आले.
सह्याद्री देवराईच्या वतीने वातावरणातील बदलावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. २०० मुले, मुली कार्यशाळेत सहभागी झाली. अशाप्रकारे आगळावेगळा निसर्ग उत्सव साजरा करत सूर्याचे, हवेचे, पावसाचे, मातीचे, आकाशाचे, वृक्षांचे, वेलचे फुलपाखरांचे ऋण व्यक्त केले आणि प्रत्येकाने स्वत:च्या हातानी एक-एक १५१ झाडे लावली. सह्याद्री देवराई बोकनगाव येथे या कार्यक्रमाला ग्रामपंचायत बोकनगावचे सरपंच किशोर दाताळ, गावातील सचिन दाताळ, शाहू बायोटेक महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. सचिन कुलकर्णी, डॉ. दत्तात्रय दगडगावे, डॉ. बी. आर. पाटील, गावातील ज्येष्ठ पुरुष, महिला भगिनी आणि विद्यार्थी यांनी उत्सवात भाग घेतला आणि निसर्गाचे ऋण व्यक्त करत झाडे लावली. या उपक्रमात सह्याद्री देवराई लातूर, संस्कृती फाउंडेशन, रोटरी क्लब मिड टाऊन, ग्रामपंचायत बोकनगाव, राजर्षी शाहु महाविद्यालय, लातूर वृक्ष चळवळ यांनी भाग घेतला.