औसा : औसा शहरात पोस्ट कार्यालयाच्या मालकीची जागा उपलब्ध असतानाही हे कार्यालय भाड्याच्या जागेवर आहे. ही बाब आमदार अभिमन्यू पवार यांच्या निदर्शनास आल्यानंतर पोस्ट कार्यालयाला हक्काची इमारत असावी. या उद्देशाने त्यांनी केंद्रीय दूरसंचारमंत्री आश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे दोन वेळेस भेट घेऊन सदरील पोस्ट कार्यालयाच्या इमारत बांधकामासाठी निधीची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
औसा येथील विभागीय पोस्ट कार्यालयातून औसा शहरासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात व शासकीय कार्यालयात महत्वाच्या कागदपत्राची देवाणघेवाण होत असते. याचबरोबर महिलांचे बचत खाते व अन्य शासकीय योजनेच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार होत असतो मात्र याच पोस्ट कार्यालयाची जागा असूनही हे कार्यालय भाड्याच्या जागेत आपले कामकाज चालवत असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या निर्देशानास आले. याबाबत २६ जुलै २०२१ रोजी केंद्रीय संचारमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन औसा येथील पोस्ट कार्यालयाच्या मालकीच्या जागेवर इमारत बांधून पोस्ट कार्यालय तिथे स्थलांतरित करावे, अशी विनंती केली होती. तसेच ६ एप्रिल २०२२ रोजी पुन्हा भेट घेऊन या विषयाचा पाठपुरावा आमदार अभिमन्यू पवार यांनी केंद्रीयमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे केला.
एकंदरीत या पाठपुरव्यास यश आले असून विभागीय पोस्ट कार्यालय बांधकामासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती एका पत्राद्वारे मंत्रालयाने कळवली आहे. या निधीबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी केंद्रीयमंत्री आश्विनी वैष्णव व याप्रकरणी मार्गदर्शन करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.