22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeलातूरकेंद्र शासनाने अन्नधान्यवरील जीएसटी रद्द करावी

केंद्र शासनाने अन्नधान्यवरील जीएसटी रद्द करावी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
संपूर्ण महाष्ट्रातून हजारो विद्यार्थी लातूर शहरात शिक्षणासाठी येत असतात. ‘मेस’ हे त्यांच्या भोजनाचे मुख्य स्त्रोत. पण गेल्या चार-पाच दिवसांत मेसच्या दरवाढीमुळे एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यानी आक्रमक पवित्रा घेत थेट तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. या संदर्भाने मेस चालकांचे म्हणणे असे की, पिण्याच्या पाण्यापासून ते खाद्य तेलापर्यंत सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना २ हजार रुपयांत संपूर्ण महिनाभर दोन वेळचे जेवण देणे परवडत नाही. प्रत्येक गोष्टीवर ‘जीएसटी’ने जेरीस आणले आहे. केंद्र सरकारच्या नव्या जीएसटी धोरणामुळे मेसचा व्यववसाय अडचणीत आला आहे. महागाईची कु-हाड एवढी जोरात कोसळली की, मेसचा व्यवसायच अडचणीत आला आहे.

तरीही हे सर्व टिकावायचे असेल तर किमान ४०० रुपये तरी दरवाढ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर आमच्या वर्षभराच्या आर्थिक बजेटमध्ये दरवाढ शक्य नाही, यामुळे आमची ओढाताण होईल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करावी, अशी मागणी आता सर्वांकडून होत आहे. शहरातील मेस चालक विशेषत: दयानंद महाविद्यालयााच्या परिसरातील खाडगाव रोडवरील मेस चालकांनी मेसच्या दरमहा दरात अचानक ४०० ते ५०० रुपयांनी वाढ केली. या दरवाढीच्या विरोधात दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मेस चालकांनी २००० रुपयांवरुन दरमहाच्या दरात अचानक ४०० ते ५०० रुपयांची वाढ केली. ही दरवाढ आम्हाला परवडत नाही, त्यामुळे ही दरवाढ मेस चालकांनी मागे घ्यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती.

लातूर शहरात ५०० हून अधिक मेस आहेत. मात्र महागाईच्या कारणावरुन मेस चालकांनी मंगळवारी मेस बंद ठेवल्या व दरमहा दरात ४०० ते ५०० रुपयांची वाढ केली. परंतू, या निर्णयाला विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला. तहसीलवर मोर्चा काढला. पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मेस चालकांचे प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाल्यानंतर मेसच्या वाढीव दराबाबत निर्णय न होता बुधवारपासून मेस पूर्ववत सुरु करण्याचा निर्णय झाल्याने सर्वच मेस पुर्ववत सुरु आहेत. असे असले तरी अद्यापही मेसच्या दरवाढीचाविषय संपलेला नाही.

किमान खर्च तरी निघायला हवा
आजच्या महागाईच्या काळात मेस चालवणे मोठ्या कसरतीचे झाले आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. ९०० रुपयांचा तांदुळ ११०० रुपयांवर गेला आहे. पाणी विकत, अन्नधान्य महाग, स्वयंपाकाचा गॅस आवाक्याच्या बाहेर, भाजीपाल्याला सोन्याचा भाव, दररोजच्या भाजीपाल्याला लागणारे ५०० रुपये, स्वयंपाकीन आणि इतर काम करणा-यांचा पगार, या सर्वच गोष्टी आवाक्याच्या बाहेर गेल्या आहेत. त्यामुळे २ हजार रुपयांत मेस चालवणे परवडत नाही. पुर्वी १९०० रुपयांत दोन वेळचे जेवण दिले. तरीही परवडत होते. परंतू, आताच्या महागाईच्या काळात हे शक्य नाही. आम्ही केलेला तरी खर्च निघायला हवा की नाही, असे अंबिका भोजनालयाच्या संचालिका जयश्री तरोडे म्हणाल्या.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत येवू नये
मागील काही दिवसापूर्वी दयानंद कॉलेज जवळील मेस चालकांनी संप केल्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना त्याचा त्रास झाला विद्यार्थी रस्त्यावर उतरले याबाबत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेवरून शनिवारी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव यांनी दयानंद कॉलेज परिसरातील काही मेसना भेटी देऊन मेस चालक व विद्यार्थी यांच्यासोबत चर्चा केली. वाढत्या महागाईमुळे गॅसचे व अन्नधान्य यांचे दर वाढले आहेत त्यात केंद्र सरकारच्या नव्या जीएसटी धोरणामुळे आणखीन महागाईत भर पडली आहे. ज्याचा परिणाम सर्वच ठिकाणी होत असून मेस चालकांनी त्यांच्या मेसच्या दरामध्ये नाईलाजाने मागच्या चार महिन्यात ४०० ते ६०० रुपयाची वाढ केली आहे आणि आज एक महिन्याकरिता मेस चालक २००० ते २२०० रुपये इतके चार्जेस विद्यार्थ्यांन कडून आकारतात. लातूर शहर हे एज्युकेशनल हब म्हणून ओळखले जाते लातूर जिल्ह्यातील व राज्यातील बरेच विद्यार्थी शिक्षणाकरिता लातूर शहरात येतात परंतु कॉलेज प्रशासन सर्वच विद्यार्थ्यांना वसतीगृह व मेसची सुविधा उपलब्ध करुन देत नसल्याने त्यांना कॉलेज परिसरामध्ये याची सोय करावी लागते. परंतु वाढत्या महागाईची झळ या विद्यार्थ्यांना सुद्धा सोसावी लागत आहे, नेहमी नेहमी वाढणारे मेसचे दर सर्वसामान्य कुटुंबातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परवडणारे नाहीत. विद्यार्थ्यांना महागाईची झळ पोहचून त्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आलेले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार करून अन्नधान्यवरील जीएसटी रद्द करावी, अशी मागणी लातूर शहर जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव यांनी केली आहे.

महागाईला तोंड देण्यासाठी दरवाढ
विद्यार्थी आमचेच आहेत. कारण आम्ही विद्यार्थी होतो आणि आमचीही आर्थिक परिस्थिती जेमतेमच होती. त्यामुळे विद्यार्थ्यांविषयी आपुलकी आहेच. परंतु वाढत्या महागाईमुळे आलेला पैसा वाटण्यातच जात असेल तर काय करणार?, आटा, तांदुळ, गॅस, भाजीपाला, कामगाराचे वेतन या सर्व गोष्टींचा ताळमेळ बसवणे खुप अवघड झाले आहे. केंद्र सरकारच्या जीएसटीच्या धोरणाने तर जीव मेटाकुटीस आणला आहे. त्यामुळे महागाईला तोंड देण्यासाठीच मेसची दरवाढ करण्याचा विचार आहे, असे साहिल भोजनालय या नॉन व्हेज मेसच्या संचालिका रुक्साना सय्यद म्हणाल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या