शिरुर अनंतपाळ : (शकील देशमुख) :
स्वस्त धान्य दुकानातून शेतक-यांना मिळणारे स्वस्त धान्य गेल्या तीन महिन्यापासून बंद झाल्याने गरजू शेतक-यांचे हाल होत आहेत. यामुळे तालुक्यातील २ हजार ९४९ लाभार्थी शेतक-यांची गैरसोय होत असून संसाराचा गाडा चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने बंद केलेले स्वस्त धान्य पुन्हा सुरू करावे, अशी मागणी तालुक्यातील लाभार्थी शेतक-यांतून केली जात आहे.
राज्य शासनाने इ.स.२०१५ मध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चौदा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांंना मदत व्हावी, यासाठी स्वस्तधान्य दुकानातून दोन रुपये किलोने गहू तर तीन रुपये किलोने तांदूळ देण्यास सुरुवात केली. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतक-यांना चांगला दिलासा मिळाला होता परंतु अचानक या शासनाने ही योजना बंद करून शेतक-यांच्या तोंडातील घास पळविला असून या निर्णयामुळे लाभार्थी शेतक-यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान तालुक्यात अंत्योदय योजनेतील २ हजार ३३, प्राधान्य कुटूंब योजनेतील १२ हजार ७०४, एपीएल शेतकरी २ हजार ९४९ असे एकूण १७ हजार ६८६ शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत.
यातील एपीएल शिधापत्रिका धारक २ हजार ९४९ लाभार्थी शेतक-यांचे जुलै, ऑगष्टमध्ये गहू बंद करण्यात आले तर सप्टेंबरनंतर तांदूळ ही बंद करण्यात आले असून ही योजना बंद झाल्याने जगाचा पोशिंंदा असलेल्या शेतक-यांवरच सवलतीच्या दरातील धान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. गेल्या सहा वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी ओल्या व कोरड्या दुष्काळाचा सामना करीत आहेत. त्यात यंदा संततधार, गोगलगाय प्रादुर्भाव,अतिवृष्टी व पुरामुळे खरीप हंगाम हातचे गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत असून शासनाने बंद केलेले स्वस्त धान्य पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे