जळकोट : प्रतिनिधी
लातूर रोड-जळकोट- बोधन या रेल्वे मार्गाच्या तरतुदीबाबत नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात बगल मिळाल्याचे दैनिक एकमतच्या अंकामध्ये दि ८ फेब्रुवारी रोजी या रेल्वे मार्गाकडे पुन्हा दुर्लक्ष झाले आहे. याबाबतचे दै एकमतने वृत्त प्रकाशित केले होते यानंतर तातडीने नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या रेल्वे मार्गाला तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली . लातूर रोड- जळकोट-मुखेड-बोधन हा १३० किलोमीटरचा रेल्वे मार्ग महत्त्वाचा आहे. या रेल्वे मार्गास २०१६ मध्ये मंजुरी मिळाली होती या मार्गासाठी १९ लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला होता. मात्र प्रत्येक वेळी अर्थसंकल्पामध्ये या रेल्वे मार्गाला बगल देण्यात येत आहे.
नांदेड-लोहा-लातूर रोड या नव्या मार्गाला तातडीने मंजूर द्यावी, नांदेड-बिदर रेल्वे मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करावी अशी मागणीही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. सन २०१६ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हा अतिशय महत्त्वपूर्ण रेल्वे मार्ग मंजूर केला होता. विशाखापटनम ते कोकण अशी दोन महत्त्वाची ठिकाणे हा रेल्वे मार्ग झाला तर जोडली जाणार आहेत. यानंतर या रेल्वे मार्गासाठी किती पूल लागणार छोटे पूल, मोठे पुल, तसेच किती जमिनीचे संपादन करावे लागणार. यामध्ये बागायती जमीन किती व जिरायती जमीन किती याचाही कच्चा सर्वे करण्यात आला आहे, असे असले तरी या रेल्वे मार्गाकडे केंद्र सरकारचे सतत दुर्लक्ष होत गेली आहे यामुळे आतापर्यंतच्या अर्थसंकल्पात या रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली नाही. यामुळेच हा रेल्वे मार्ग मागे पडला आहे . या रेल्वे मार्गांसोबत मंजूर झालेल्या अनेक रेल्वे मार्गाची कामे सुरू झालेली आहेत मात्र या रेल्वे मार्गाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे .