रेणापूर : प्रतिनिधी
तालूक्यातील दर्जी बोरगांव येथील चिन्मयानंद स्वामी समाधी सोहळा दि १५ ते २२ जानेवारी दरम्यान साजरा झाला. या दरम्यान दररोज धार्मिक कार्यक्रमासह रामकथा, कीर्तनाचे कार्यक्रम होऊन रविवारी (दि.२२) काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने भक्तीमय वातावरणात या सोहळयाची सांगता झाली. येथील जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. चिन्मयानंद स्वामींनी याच ठिकाणी समाधी घेतली. मागील ९९ वर्षिंपासून स्वामींचा समाधी सोहळा धार्मिक उपक्रमांनी साजरा केला जातो. राज्यातील विविध भागातील भक्त या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात. या सोहळ्या दरम्यान ह भ प राजेश महाराज पाटील गुंजरगेकर, अनिल महाराज पाटील, संजय महाराज पाचपोर, उमेश महाराज दशरथे, ज्ञानेश्वर महाराज, शिंदे रामभाऊ महाराज, राऊत उल्हास महाराज सूर्यवंशी यांची कीर्तने झाली. दररोज काकडा, भजन, जागर अशा या उपक्रमांसोबतच ह भ प विदर्भ रत्न संजय महाराज पाचपोर यांची रामकथा झाली.
सप्ताहा दरम्यान ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांकडून अन्नदान करण्यात आले. दर्जी बोरगांव, ब्रम्हवाडी, सिंधगांव, महापूर, नागझरी यासह परिसरातील ग्रामस्थ दरवर्षी सोहळया दरम्यान अन्नदान करतात. यावर्षीही ही परंपरा कायम राहिली. याच कालावधीत राम बोरगांवकर बंधूनी आपली सेवा सादर केली. (अंबाजोगाई) येथील मोदी कुटुंबियांच्या वतीने शोभेची दारुही उडविण्यात आली. सांगतेपूर्वी गावातून श्रींची पालखी काढण्यात आली. रविवार दि.२२ रोजी जयवंत महाराज बोधल महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हजारो भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी चिन्मयानंद स्वामी संस्थानच्या पदाधिका-यांसह गावचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.