24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरमहाविद्यालयांनी गुणवत्तावाढीकडे लक्ष द्यावे

महाविद्यालयांनी गुणवत्तावाढीकडे लक्ष द्यावे

एकमत ऑनलाईन

लातूर : नवे शैक्षणिक धोरण व नॅकने घालून दिलेल्या निकषांनुसार महाविद्यालयांनी शिक्षणपध्दतीत बदल करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. आर. टी. देशमुख यांनी येथे केले. येथील संगणकशास्त्र व माहितीतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने (कॉक्सिट) नॅकच्या (राष्ट्रीय मूल्यांकन प्रत्यायन परिषद) सहकार्याने ‘उच्च शिक्षणातील गुणवत्तावाढ’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. एम. आर. पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बसवराज नागोबा, कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, उपप्राचार्य डॉ. बी. एल. गायकवाड, डॉ. व्ही. व्ही. भोसले, प्रा. डी. आर. सोमवंशी, डॉ. डी. एच. महामुनी, ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलचे प्रमुख तथा आयक्यूएसीचे सदस्य प्रा. कैलास जाधव उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. अशा महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते का, याचा विचार होणे गरजेचे आहे. प्राध्यापक हे गुणवत्ताधारक व पीएच. डी. धारक असले तरी ते आपल्या विषयाचा अभ्यास करून विद्यादान करतात का, यावर नॅकचे लक्ष असते. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देवून त्यांना संशोधनाकडे वळवणे गरजेचे आहे. संशोधनाची गोडी निर्माण होईल, असे वातावरण महाविद्यालयात असणे गरजेचे आहे. नवीन शिक्षण धोरणानुसार प्रत्येक महाविद्यालयाने स्वत:च्या शिक्षण पध्दतीत बदल करून घेणे गरजेचे आहे. विद्यार्थीकेंद्रित शिक्षण मिळणे गरजेचे आहे.

येथील कॉक्सिट महाविद्यालयाने सुसज्ज ग्रंथालय, भरपूर तज्ज्ञ प्राध्यापक, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, आधुनिक प्रयोगशाळा आदी बाबी उपलब्ध करून दिल्या आहेत. आणखी इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास या महाविद्यालयाला ‘ए प्लस प्लस’ दर्जा मिळणे अवघड नाही, असा विश्­वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रारंभी डॉ. देशमुख यांचे स्वागत कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. कैलास जाधव यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या